नवी दिल्ली : शकुंतला देवी यांना ‘मानवी कॉम्प्युटर’ म्हणून संबोधले जात होते. अनेक किचकट गणितीय क्रिया त्या क्षणात करून दाखवत असत. त्यांच्या या क्षमतेचे त्यांनी देश-विदेशात अनेक ठिकाणी प्रदर्शन केले होते व त्यांच्या जीवनावर आधारित ‘शकुंतला’ हा विद्या बालनचा चित्रपटही येऊन गेला आहे. आता आपल्या देशात अवघ्या चौदा वर्षांच्या मुलाची ‘मानवी कॅल्क्युलेटर’ अशी ओळख बनली आहे. नाशिकमधील आठवीत शिकणार्या या मुलाने गणिताशी संबंधित अनेक विश्वविक्रम केले असून, त्याच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. आर्यन शुक्ला असे या मुलाचे नाव. त्याने नुकतेच केवळ मनानेच गणिते सोडवण्याचे सहा जागतिक विक्रम एकाच दिवसात केले आहेत.
त्याने चार आकडी शंभर अंकांची 30.9 सेकंदांमध्ये बेरीज करणे, चार आकडी 200 अंकांची 1 मिनिट, 9.68 सेकंदात बेरीज करणे, आणि पाच आकडी 50 अंकांची 18.71 सेकंदात बेरीज करणे असे विक्रम केले आहेत. तसेच मोठ्या संख्येतील गुणाकार 51.69 सेकंदात करणे व त्यापेक्षाही मोठ्या अंकांचा गुणाकार 2 मिनिट, 35.41 सेकंदात करणे असे विक्रमही केले आहेत. मोठ्या संख्येच्या भागाकाराचे गणित पाच मिनिटे व 42 सेकंदात केवळ मनानेच सोडवून दाखवण्याचाही विक्रम त्याने केला आहे. एखाद्या माणसाला असे आकडे कॅल्क्युलेटरवर टाईप करण्यासाठीच जितका वेळ लागतो, तितक्या वेळेत त्याने अख्खे गणितच सोडवून उत्तर सांगितले. दुबईमध्ये गिनिज बुकने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्याने हा विक्रम नोंदवला. या विक्रमाचा व्हिडीओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस् वेबसाईटवर पाहता येतो. यापूर्वीही त्याने अनेक विक्रमांची नोंद केलेली आहे.