तिरुवनंतपूरम : आजच्या युगात जिथे बहुतांश लहान मुले मोबाईल आणि डिजिटल स्क्रीनमध्ये रमलेली असतात, तिथे 14 वर्षांच्या अनन्या विश्वेशने एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला आहे. इतरांचे वीकेंडस् व्हिडीओ गेम्स आणि सोशल मीडियावर जातात, तर अनन्यासाठी वीकेंड म्हणजे जंगलाच्या पायवाटा, पानांची सळसळ आणि वन्यजीवनाचे रोमांच अनुभवणे आहे. निसर्गाशी असलेले तिचे हे नाते तिला केवळ खास बनवत नाही, तर तिच्यासाठी जीवनातील सर्व चांगल्या शक्यतांचे द्वार उघडते. 75 सापांना वाचवणारी आणि सहा भाषा शिकलेली ही चौदा वर्षीय कन्या इतरांसाठी प्रेरणादायक बनलेली आहे.
या मुलीची कहाणी आपल्याला विचार करण्यास लावते की, जर लहान मुलांनी किंवा मोठ्यांनीही मोबाईल स्क्रीनसमोर राहण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला, तर त्यांचे जग किती बदलू शकते. केरळची 14 वर्षीय अनन्या विश्वेश याचे उत्तम उदाहरण आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक वीकेंडमध्ये जंगल, पायवाटा आणि वन्यजीवनाचा समावेश असतो. शेजारच्या कोणाला साप दिसला किंवा केरळ वन विभागाला एखाद्या बचावासाठी मदतीची गरज भासली, तर सर्वात आधी अनन्याला बोलवले जाते.
अनन्याचा विश्वास आहे की, ‘होमस्कूलिंग’मुळे तिला निसर्गाला जवळून पाहण्याची संधी मिळाली. तिच्या पालकांनी लहानपणापासूनच तिच्या या आवडीला प्रोत्साहन दिले. पाचवीत असताना ऊटीला केलेली एक सहल तिच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरली, अशी आठवण ती सांगते. त्या प्रवासानंतर तिला जंगल इतके आवडू लागले की तिने आपल्या पालकांना शहर बदलण्यासाठी राजी केले. कोव्हिड महामारीच्या काळात तिला ऊटीच्या जंगलांना समजून घेण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. हळूहळू ती आजुबाजूच्या लोकांशी आणि निसर्गप्रेमींशी जोडली गेली. निलगिरीची जैव-विविधता आणि तेथील दुर्मीळ जीव तिच्या आयुष्याचा भाग बनले.
जंगल सफारी गाईड तिचे मित्र झाले आणि स्थानिक लोकांनीही तिला ओळखायला सुरुवात केली. याच दरम्यान, मासिनागुडी इको नॅचरलिस्ट क्लब नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने तिच्याशी संपर्क साधला आणि ती त्या संस्थेची सर्वात कमी वयाची सदस्य बनली. सुरुवातीला अनन्याच्या वडिलांनी होमस्कूलिंगला मान्यता दिली नव्हती, पण जसजसे त्यांना आपल्या मुलीचे वन्यजीवनाबद्दलचे प्रेम समजले, तसतसे ते तिच्यासोबत जंगल यात्रांवर जाऊ लागले. अनन्याला केवळ छंद म्हणून नव्हे, तर खर्या अर्थाने वन्यजीव संवर्धनाशी जोडले जायचे आहे, हे त्यांना जाणवले. जंगलाने तिला केवळ सुंदर द़ृश्येच दाखवली नाहीत, तर काही कटू सत्यही शिकवले. एकदा एका हत्तीच्या शवविच्छेदनादरम्यान त्याच्या पोटातून प्लास्टिकचा ढीग बाहेर पडला. ही घटना पाहून अनन्या आणि तिचे वडील दोघेही हादरले.
याच घटनेने अनन्याला जागरूकता पसरवण्याच्या दिशेने प्रेरित केले. आता केरळला परतल्यानंतरही अनन्या तिचा प्रत्येक मोकळा क्षण जंगलात घालवते. तिला जंगलातील प्रत्येक जीवावर प्रेम आहे, विशेषतः हत्तींवर. सोशल मीडियाचा वापर ती केवळ मनोरंजनासाठी नाही, तर शिकण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी आणि स्वयंसेवकाच्या नवीन संधी शोधण्यासाठी करते. आज अनन्या पलक्कड येथील सर्प बचावकर्त्यांसोबत काम करते. तिने 11 व्या वर्षी हर्पेटोलॉजीमध्ये (कशीशिीेंश्रेसू-सरपटणार्या प्राण्यांचा अभ्यास) ज्युनियर मास्टर्स डिग्री पूर्ण केली होती, ज्यामुळे तिला सापांना समजून घेण्यास आणि वाचविण्यात मदत मिळाली. आतापर्यंत तिने 75 हून अधिक सापांना वाचवले आहे. ती मुलांना जंगलाच्या गोष्टी सांगते, त्यांना निसर्गाशी जोडते आणि एका दिवसाच्या नेचर कॅम्पमध्ये त्यांना जंगलाच्या जवळ घेऊन जाते. सहा भाषांचे ज्ञान असल्यामुळे मुलांना समजून सांगणे तिला सोपे जाते. आतापर्यंत तिने 9,500 हून अधिक मुलांना निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे.