1,200 Year Old Well | स्वस्तिकचा आकार असणारी तब्बल १,२०० वर्षे जुनी विहीर  
विश्वसंचार

1,200 Year Old Well | स्वस्तिकचा आकार असणारी तब्बल १,२०० वर्षे जुनी विहीर

पुढारी वृत्तसेवा

चेन्‍नई : आपल्या देशात अनेक सुंदर व वैशिष्ट्यपूर्ण विहिरी पाहायला मिळतात. ‘चाँद बावडी’, ‘रानी की वाव’सारख्या अनोख्या पायऱ्यांच्या विहिरींची तर जगप्रसिद्ध आहे. अशीच एक तब्बल १२०० वर्षे जुनी विहीरही आपल्या देशात असून तिच्या अद्‍भुत अभियांत्रिकीमुळे या विहिरीची चर्चा होत असते. ही ऐतिहासिक विहीर तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जवळील ‘तिरुवेल्लराई’ येथे स्थित आहे. स्थानिक भाषेत या विहिरीला ‘मारपिडुगु पेरुंगिनार’ म्हणजेच ‘स्वस्तिक विहीर’ म्हणून ओळखले जाते. नुकतेच या विहिरीचे एक ड्रोन फुटेज समोर आले असून, त्यातून पल्लवकालीन स्थापत्यकलेचे आणि अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळत आहे.

या ऐतिहासिक विहिरीची निर्मिती पल्लव वंशातील राजा दंतिवर्मन यांच्या शासनकाळात झाली होती. ‘कंबन अरायन’ यांनी ही विहीर बांधली होती. कंबन अरायन हे पल्लव काळातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि महान वास्तुकार होते; ज्यांची तुलना आजच्या आधुनिक इंजिनिअर्सशी केली जाऊ शकते. त्यांनी इतरही अनेक बांधकामे केली, परंतु त्यांना खरी आणि सर्वाधिक प्रसिद्धी या ‘स्वस्तिक विहिरी’च्या निर्मितीमुळेच मिळाली. या विहिरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचा विशेष आकार.

विहिरीतून पाणी भरताना कोणालाही अडचण येऊ नये, यासाठी विहिरीच्या चारही बाजूंनी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. या पायऱ्यांमुळे एकाच वेळी अनेक लोक गर्दी किंवा त्रास न होता सहजपणे पाणी भरू शकत असत. या चारही बाजूंच्या पायऱ्या एकत्रितपणे पाहिल्यास ‘स्वस्तिक’चा आकार तयार होतो. ही विहीर भारतातील प्राचीन आणि समृद्ध जलव्यवस्थापनाचे प्रतीक मानली जाते. ही विहीर प्रसिद्ध पुंडरीकाक्ष पेरुमल मंदिराच्या जवळ आहे. भारतीय इतिहासकारांच्या मते, प्राचीन काळात समृद्ध व्यापाऱ्यांनी मंदिरातील या विहिरीचा जीर्णोद्धार केला होता.

SCROLL FOR NEXT