Prehistoric Giant Dinosaur | आग्नेय आशियात होता 12 कोटी वर्षांपूर्वी मोठा डायनासोर 
विश्वसंचार

Prehistoric Giant Dinosaur | आग्नेय आशियात होता 12 कोटी वर्षांपूर्वी मोठा डायनासोर

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक (थायलंड) : लंडनच्या प्रसिद्ध डबल डेकर बसपेक्षा तिप्पट मोठा असणारा आणि तब्बल 12 कोटी वर्षांपूर्वी आग्नेय आशियात (साऊथ ईस्ट एशिया) वावरणारा एक अवाढव्य डायनासोर संशोधकांनी शोधून काढला आहे. नागाटायटन चैयाफुमेन्सिसअसे या अक्राळविक्राळ प्राण्याचे नाव असून, हा आग्नेय आशियात आढळलेला आजवरचा सर्वात मोठा डायनासोर ठरला आहे.

जीवाश्मांच्या (फॉसिल्स) अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी या महाकाय प्राण्याची काही वैशिष्ट्ये जगापुढे मांडली आहेत. हा डायनासोर तब्बल 88 फूट (27 मीटर) लांब होता आणि त्याचे वजन 27 टन होते. म्हणजेच आजच्या 9 पूर्ण वाढ झालेल्या आशियाई हत्तींचे वजन एकत्र केले, तर जितके होईल तितके या एकट्या डायनासोरचे वजन होते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे (यूसीएल) संशोधक थितीवूत सेथापनिचसाकुल यांनी सांगितले की, एवढा प्रचंड आकार असूनही हा प्राणी अत्यंत शांत आणि शाकाहारी होता. लांब मान असल्यामुळे तो झाडांच्या शेंड्यावरील पाने ओरबाडून खात असे.

थायलंडच्या उत्तर भागातील चैयाफुम प्रदेशात एका गावकर्‍याला 10 वर्षांपूर्वी तलावाच्या काठावर काही अवाढव्य हाडे आढळली होती. तेव्हापासून पॅलेओन्टोलॉजिस्टनी (जीवाश्म शास्त्रज्ञ) येथे उत्खनन सुरू केले. शास्त्रज्ञांना या प्राण्याच्या पाठीचा कणा, बरगड्या, पेल्विस (कमरेचे हाड) आणि मानवी आकाराएवढे मोठे पुढच्या पायाचे हाड शोधण्यात यश आले. आग्नेय आशियातील संस्कृतीत पाण्याचा देव मानल्या जाणार्‍या नागा या काल्पनिक सापावरून त्याचे नाव नागाटायटन ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT