टोकियो : जपानमध्ये ११८ वर्षे जुन्या तुरुंगाचे रुपांतर आता आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. या ऐतिहासिक इमारतीला तोडण्याच्या ऐवजी त्याला एक नवीन ओळख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नारा शहरातील जुना तुरुंग आता ‘होशिनोया नारा प्रिझन रिसॉर्ट’ या नावाने ओळखला जात आहे. या हॉटेलमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत असून, बाहेरून पाहता ही बिल्डिंग तुरुंगाच्या जुन्या आर्किटेक्चर सांभाळून आहे, तर आत पाऊल ठेवताच जुन्या सेल्समध्ये मॉडर्न फर्निचर, आरामदायक बेड आणि आलिशान सुविधा दिसून येतात.
हॉटेलची सर्वात लक्षवेधी गोष्ट आहे येथील खोल्या. येथील खोल्या या नव्या बिल्डिंगमध्ये तयार करण्यात आलेल्या नाहीत, तर जुन्या सेल्सच्या रचनेचा सुद्धा भाग आहेत. जुन्या खोल्यांना आपसात जोडून आरामदायक सुईट्स बनवले गेले आहेत. रिपोर्टनुसार या आलिशान हॉटेलमध्ये एकूण ४८ सुईट्स आहेत. या खोल्यांमध्ये जुन्या लाल मातीच्या विटांचा वापर करण्यात आलेला आहे. तुरुंगाच्या मूळ वास्तूला जपून ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे, लाकडाचा वापर, आधुनिक फर्निचर आणि समकालीन सुविधांमुळे त्यांना एखाद्या आलिशान हॉटेलचा लूक आणि अनुभव प्राप्त झाला आहे. थोडक्यात सांगायचे तर, येथे येणारा पाहुणा एकाच वेळी इतिहासाचा अनुभव घेऊ शकतो आणि त्याचबरोबर उच्च दर्जाच्या हॉटेलमधील सुख-सुविधांचा आनंदही घेऊ शकतो.
हॉटेलच्या डिझाईनला खास बनवण्यासाठी जुन्या इमारतीची ओळख मिटवण्यात आली नाही. लाल विटांच्या भिंती, छताची मूळ रचना आणि तुरुंगाची मूळ संरचना यांचा हॉटेलच्या सजावटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हॉटेलमधील सुईट्समध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. यात अकरा ‘सेल डिलक्स सुईट्स’चा समावेश आहे, जिथे पाहुण्यांना स्वतंत्र ड्रेसिंग लाऊंज आणि प्रशस्त लिव्हिंग एरियाचा (बैठकीच्या जागेचा) आनंद घेता येतो. या हॉटेल रूममध्ये राहण्याचं एका दिवसाचं भाडं हे जवळपास १,४७,००० जपानी येन एवढं आहे. यात टॅक्स आणि सर्व्हिस चार्ज सामील असून, जेवणाचा यात समावेश नाही. भारतीय रुपयांमध्ये पाहायचं झालं तर येथे राहण्यासाठी जवळपास एक लाख प्रति दिवसाचं भाडं आहे!