117 वर्षे जगलेल्या महिलेच्या दीर्घायुष्याचे उलगडले रहस्य 
विश्वसंचार

117 वर्षे जगलेल्या महिलेच्या दीर्घायुष्याचे उलगडले रहस्य

संशोधनातून 'ही' माहिती आली समोर

पुढारी वृत्तसेवा

सॅन फ्रान्सिस्को ः मारिया ब—ान्यास मोरेरा या ऑगस्ट 2024 मध्ये वयाच्या 117 व्या वर्षी निधन पावल्या. परंतु त्यांच्या शरीराच्या जैविक पैलूंमध्ये वृद्धत्वाच्या तुलनेत अधिक तारुण्याचे लक्षण दिसून आले, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन दीर्घायुष्य आणि रोगप्रतिबंधक क्षमतेमधील संबंध उलगडण्यास मदत करू शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ब—ान्यास यांच्या लघवी, रक्त, मल आणि लाळेच्या नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, त्यांच्या शरीरात काही विशेष जैविक गुणधर्म होते. त्यामध्ये रोगप्रतिरोधक प्रणालीशी संबंधित विशिष्ट जनुके, उत्तम कोलेस्टेरॉल पातळी आणि आतड्यांमध्ये सूज कमी करणार्‍या सूक्ष्म जीवांची भरपूर संख्या यांचा समावेश होता.

हे संशोधन बायोआर्काइव या प्रीप्रिंट सर्व्हरवर प्रसिद्ध झाले असून अद्याप ते समकक्ष पुनरावलोकन प्रक्रियेत आहे. या संशोधनाचे मुख्य लेखक आणि स्पेनच्या जोसेप कॅरेरास इन्स्टिट्यूटचे मॅनेल एस्टेलर यांनी स्पष्ट केले की, अत्यंत वृद्धावस्था गाठली तरी वृद्धांसाठी सामान्य असणार्‍या आजारांपासून मुक्त राहण्यामागील कारणे शोधणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. काही शास्त्रज्ञांना मात्र अत्यंत वृद्ध व्यक्तींच्या अभ्यासाचा फायदा कितपत होईल याबाबत शंका आहे. त्यांचे मत आहे की, या व्यक्तींच्या वयाची नोंद अचूक आहे का, हे पडताळणे कठीण असते. संशोधकांनी ब—ान्यास यांच्या जनुकीय संरचनेची तुलना ‘1000 जीनोम्स प्रोजेक्ट’ मधील 75 इबेरियन महिलांशी केली. या अभ्यासात त्यांच्या जीनोममध्ये सात अतिशय दुर्मीळ जनुकीय बदल आढळले, जे यापूर्वी युरोपीय लोकसंख्येत कधीही आढळले नव्हते. ब—ान्यास या 1907 मध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे जन्मल्या. त्यांनी टेक्सास व लुईझियानामध्ये बालपण घालवले. 1915 मध्ये स्पॅनिश वडिलांसोबत स्पेनमध्ये स्थायिक झाल्या. शेवटच्या दिवसांपर्यंत त्या मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि निरोगी होत्या. त्यांच्या मृत्यूपश्चात करण्यात आलेले हे संशोधन मानवी आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने नवे दालन उघडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT