न्यूयॉर्क : समाजातील दुर्लक्षित घटकांना सन्मान मिळवून देण्यासाठी दिलेले लढे अनेकदा काळाच्या ओघात विरून जातात. मात्र, वृद्धांना हक्काचे छत आणि सन्मानजनक जीवन देण्यासाठी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील प्रेस्कॉट शहरात जगातील पहिल्या सरकारी वृद्धाश्रमाची स्थापना झाली. या घटनेला आता 115 वर्षे झाली आहेत!
वृद्धांसाठी सरकारी निवारा असावा, ही मागणी सर्वात आधी मेजर ए. जे. डोरन, जॉनी ड्यूक आणि फँ्रक एम. मर्फी या तीन मित्रांनी लावून धरली. 1907 मध्ये डोरन यांनी विधानसभेत यासंदर्भात विधेयक मांडले, परंतु ते फेटाळण्यात आले. तरीही हार न मानता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर 1909 मध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली. 11 मार्च 1909 रोजी तत्कालीन गव्हर्नर जोसेफ हेन्री किब्बे यांनी या कायद्यावर स्वाक्षरी करून इतिहास घडवला. या वृद्धाश्रमाची इमारत फ्रँक मर्फी यांनी दान दिलेल्या 4.5 एकर जमिनीवर उभारण्यात आली. प्रेस्कॉटमधील ग्रॅनाईट खडकांवर तीन मजली भव्य वास्तू उभी राहिली. या इमारतीचे डिझाईन डब्ल्यू. एस. इलियट या महिला आर्किटेक्टने केले होते. लाल विटा आणि लाकडी व्हरांडे असलेल्या या वास्तूच्या बांधकामासाठी त्याकाळी सुमारे 25 हजार डॉलर खर्च आला होता. 1 फेब—ुवारी 1911 रोजी या वृद्धाश्रमाची दारे पहिल्यांदा उघडली गेली. सुरुवातीला येथे केवळ 40 पुरुषांना प्रवेश मिळाला.
येथे राहण्यासाठीचे नियम अत्यंत कडक होते : वय किमान 60 वर्षे असावे, संबंधित व्यक्ती अॅरिझोनामध्ये किमान 25 वर्षे वास्तव्यास असावी, ती व्यक्ती आर्थिकद़ृष्ट्या पूर्णपणे असहाय असावी. या कायद्यासाठी लढा देणारे ए. जे. डोरन यांचीच येथील पहिले अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. काळाप्रमाणे या संस्थेचा विस्तार होत गेला. 1916 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला, तर 1929 मध्ये खाण कामगारांच्या उपचारासाठी रुग्णालयही जोडले गेले. विशेष म्हणजे, हे ऐतिहासिक वृद्धाश्रम आजही राज्य सरकार यशस्वीपणे चालवत आहे. सध्या येथे 125 हून अधिक वृद्ध राहू शकतात. आताच्या नियमांनुसार, येथे राहण्यासाठी वय किमान 70 वर्षे आणि 50 वर्षांचे अॅरिझोनामधील वास्तव्य अनिवार्य आहे. येथे राहणारे वृद्ध आपल्या मासिक उत्पन्नाचा केवळ एक ठराविक हिस्सा शुल्क म्हणून देतात.