लंडन : शंभरी गाठणे हे अनेकांचे स्वप्न असते; पण १११ वर्षे जगणे आणि तेही उत्साहाने, ही खरोखरच अद्भुत गोष्ट आहे. सध्या अमेरिकेतील सर्वात वृद्ध पुरुष ठरलेले लुईस कानो यांनी आपल्या या दीर्घ प्रवासाचे रहस्य जगासमोर उघड केले आहे. ९ डिसेंबर १९१४ रोजी जन्मलेल्या कानो यांनी नुकताच आपला १११ वा वाढदिवस साजरा केला.
‘फॉक्स ५ न्यूयॉर्क’ला दिलेल्या मुलाखतीत लुईस कानो यांनी तीन सवयी त्यांच्या दीर्घायुष्याचा आधार असल्याचे सांगितले. मद्यपानापासून लांब राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. कानो यांनी आयुष्यभर कधीही मद्यपान केले नाही. आधुनिक विज्ञानानुसार, मद्यपानामुळे झोपेवर परिणाम होतो, शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि पेशींची वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. कानो यांनी या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवले. दीर्घायुष्यासाठी झोप हे सर्वात प्रभावी साधन आहे. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी कानो दररोज ७ ते ९ तास शांत झोप घेण्यावर भर देतात. सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाचे फुफ्फुसे आणि हृदयावर होणारे घातक परिणाम सर्वांना ठाऊक आहेत. कानो यांनी आयुष्यभर धूम्रपान टाळल्याने त्यांना श्वसनाचे किंवा हृदयाचे गंभीर विकार झाले नाहीत.
'सुखी' जगण्याचे गुपित ‘चांगले वागा!’ केवळ शारीरिक
आरोग्यच नाही, तर मनःशांती कशी मिळवायची, यावर विचारले असता त्यांनी अतिशय सोपे उत्तर दिले— ‘सर्वांशी चांगले वागा.’ धावपळीच्या आयुष्यात लोक एकमेकांशी चांगले वागणे विसरतात; मात्र कानो यांच्या मते, हीच गोष्ट तुम्हाला मनातून तरुण आणि आनंदी ठेवते.