तेहरान : आजच्या काळात आपण एखाद्या समारंभाला किंवा डिनर पार्टीला जाताना सोबत भेट म्हणून एखादी खास वस्तू घेऊन जातो. यामागे केवळ भेटवस्तू देण्याचा उद्देश नसतो, तर आपण किती विचारपूर्वक आणि कष्ट घेऊन ती निवडली आहे, हे दाखवण्याचाही प्रयत्न असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुमारे 11,000 वर्षांपूर्वी पश्चिम इराणमध्ये राहणार्या लोकांची विचारसरणी अगदी अशीच होती, फक्त त्यांची पद्धत थोडी वेगळी होती. एका नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, झाग्रोस पर्वतरांगेतील ‘असिआब’ नावाच्या ठिकाणी प्राचीन काळी लोक मोठ्या मेजवान्यांसाठी एकत्र जमत असत. या मेजवानीनंतर उरलेले पुरावे संशोधकांना सापडले आहेत, ज्यात 19 रानडुकरांच्या कवट्यांचा समावेश आहे. या कवट्या एका गोल इमारतीमधील खड्ड्यांत अतिशय व्यवस्थित रचून सीलबंद केलेल्या अवस्थेत सापडल्या. या कवट्यांवर असलेल्या खुणांवरून हे स्पष्ट होते की, या प्राण्यांचा उपयोग मेजवानीसाठी केला गेला होता. पण आतापर्यंत हे प्राणी कुठून आणले गेले होते, हे एक गूढ होते.
संशोधकांनी यापैकी पाच रानडुकरांच्या दातांच्या इनॅमलची सूक्ष्म रासायनिक तपासणी केली. या तपासणीतून एक धक्कादायक बाब समोर आली. यातील काही रानडुक्कर हे स्थानिक नव्हते, तर त्यांना अत्यंत दूरच्या आणि दुर्गम पर्वतीय प्रदेशातून प्रचंड कष्ट घेऊन मेजवानीच्या ठिकाणी आणण्यात आले होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही मेजवानी आयोजित केली होती, तिथे स्थानिक पातळीवरही रानडुक्कर उपलब्ध होते. तरीही, काही लोकांनी मैलोन्मैल प्रवास करून, डोंगर-दर्या पार करून विशिष्ट ठिकाणचे रानडुक्कर आणले. यावरून असे दिसून येते की, मेजवानीसाठी आणलेली भेटवस्तू कुठून आणली आहे, याला त्यावेळी खूप महत्त्व होते. हे एक प्रकारचे ‘भौगोलिक प्रतीक’ (Geographic symbolism) होते. पुरातत्त्वीय नोंदींमध्ये मेजवान्यांचे पुरावे मोठ्या प्रमाणात सापडतात; परंतु ते बहुतेक करून शेतीवर अवलंबून असलेल्या समाजांचे आहेत. शेतीमुळे अन्नधान्याचा अतिरिक्त साठा करणे शक्य होते, ज्यामुळे मोठ्या मेजवान्यांचे आयोजन सोपे होते. किंबहुना, काही तज्ज्ञांच्या मते, अशा मेजवान्यांच्या गरजेतूनच शेतीचा स्वीकार झाला असावा, जरी हा सिद्धांत वादग्रस्त असला, तरी ‘असिआब’ येथील ही मेजवानी खास आहे. कारण ती शेतीचा शोध लागण्यापूर्वीच्या काळातील आहे. अशा प्रकारच्या मेजवानीचे पुरावे जगात खूपच दुर्मीळ आहेत. यातून हेच सिद्ध होते की, त्या काळातील लोकांनी केवळ एकत्र येऊन भोजन केले नाही, तर आपल्या योगदानाला अधिक मौल्यवान बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी आणलेली भेट ही केवळ एक प्राणी नसून, त्यांच्या कष्टाचे आणि त्यांच्या प्रदेशाचे प्रतीक होती.