Pembroke Castle fossils | ब्रिटनच्या पेमब्रोक कॅसलखालील गुहेत 1 लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म 
विश्वसंचार

Pembroke Castle fossils | ब्रिटनच्या पेमब्रोक कॅसलखालील गुहेत 1 लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्म

पुढारी वृत्तसेवा

लंडन : वेल्समधील प्रसिद्ध ‘पेमब्रोक कॅसल’च्या खाली असलेल्या ‘वोगन कॅव्हर्न’ या गुहेचा अभ्यास करणार्‍या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एक खळबळजनक दावा केला आहे. हे स्थळ ब्रिटनमधील आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या प्रागैतिहासिक शोधांपैकी एक ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 11 व्या शतकातील या ऐतिहासिक किल्ल्याच्या खाली लपलेल्या गुहेत 1 लाख वर्षांहून अधिक जुन्या मानवी आणि प्राण्यांच्या हालचालींचे पुरावे सापडले आहेत. संशोधकांना या ठिकाणी दगडाची हत्यारे, तसेच मॅमथ (प्राचीन हत्ती), केसाळ गेंडे आणि पाणघोड्यांची हाडे सापडली आहेत.

एबरडीन विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, या गुहेत ‘निएंडरथल’ आणि सुरुवातीच्या ‘होमो सेपियन्स’चे अवशेष किंवा त्यांच्या खुणा असू शकतात. यामुळे ब्रिटनच्या प्राचीन इतिहासाबद्दल अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, हा पेमब्रोक किल्ला राजा हेन—ी सातवा याचे जन्मस्थान देखील आहे. किल्ल्याच्या आत असलेल्या एका वळणदार पायर्‍यांच्या वाटेने या गुहेपर्यंत पोहोचता येते. ही गुफा सुमारे 23 मीटर लांब आणि 10 मीटर उंच आहे. अनेक वर्षांपासून पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे असे मत होते की, या जागेला कोणतेही वैज्ञानिक महत्त्व उरलेले नाही.

व्हिक्टोरियन काळात झालेल्या उत्खननात येथील सर्व पुरावे नष्ट झाले असावेत, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या उत्खननातून असे दिसून आले की, जमिनीच्या थराखाली प्राचीन अवशेष अजूनही सुरक्षित आहेत. येथे पाणघोड्यांचे अवशेष मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण, हे अवशेष सुमारे 1,20,000 वर्षे जुने असू शकतात. त्या काळी ब्रिटनचे हवामान आजच्या तुलनेत खूप उष्ण होते, ज्यामुळे वेल्ससारख्या भागातही पाणघोड्यांसारखे मोठे प्राणी वास्तव्य करू शकत होते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT