लंडन : हार्वर्ड मेडिकल स्कूलने खास मेडिटेशन ओपन अवेयरनेसबाबत माहिती दिली असून यात दिवसातून अगदी 10 मिनिटांची ध्यानधारणा केली तरी 40 टक्के ताणतणाव कमी केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. आपल्याकडे ध्यान करण्यासाठी इतकाही वेळ नाही, असे म्हणणे सोपे आहे. रोजच्या आयुष्यात बरेच काही घडत असते. कोणी थांबू शकत नाही, असे म्हणणेही सोपे आहे; पण ज्यावेळी 10 मिनिटे मिळतील, त्यावेळी ध्यानाचा सराव करावा. यामध्ये केवळ एकावेळी एकच काम म्हणजे ध्यानधारणा करायची असते. यात कोणतेही मल्टिटास्किंग असत नाही, असेही या अभ्यासात नमूद आहे.
हार्वर्डच्या तज्ज्ञांनुसार, ब्रीदिंग मेडिटेशनने सुरुवात करणे हा सर्वात सोपा उपाय आहे. हा एक छोटासा सराव असून तो आपण कुठेही करू शकतो. यात तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात डोळे बंद करत शरीराचे वजनाकडे लक्ष केंद्रित करावे, दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास बाहेर सोडताना आपण स्ट्रेस रीलिज करत असल्याची कल्पना करावी. यामुळे, ऑक्सिजनचा स्तर वाढेल. शिवाय, नर्वस सिस्टीम शांत राहील.
दुसर्या टप्प्यात आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. जर लक्ष भरकटले असेल तर हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करावे. यात जे लोक 10 मिनिटे ध्यानधारणा करु शकतात, त्यांचा ताणतणाव 40 टक्यांपर्यंत कमी होतो. तिसर्या टप्यात शरीरातील प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचत असल्याची कल्पना करावी, आसपासच्या वातावरणाचा अंदाज करावा आणि त्यानंतर थोड्या वेळाने हळूहळू डोळे उघडावेत. ही प्रक्रिया रोजच्या दैनंदिनीत समाविष्ट करावी, असेही यात पुढे म्हटले आहे.