Italian Wall Lizard | क्रोएशियातील बेटावर दहा पाली सोडल्या आणि... 
विश्वसंचार

Italian Wall Lizard | क्रोएशियातील बेटावर दहा पाली सोडल्या आणि...

३६ वर्षांनी परतल्यावर पाहिले निसर्गाचे अद्‌भुत रूप!

पुढारी वृत्तसेवा

रोम : शास्त्रज्ञांच्या एका टीमने १९७१ मध्ये १० पालींना क्रोएशियातील एका बेटावर नेऊन सोडले होते. या ‘इटालियन वॉल लिझार्ड’ प्रजातीच्या पाली होत्या, ज्यामध्ये ५ नर आणि ५ मादींचा समावेश होता. यानंतर तब्बल ३६ वर्षे त्यांची कोणतीही शोध घेऊन माहिती घेण्यात आली नाही. २० व्या शतकाच्या शेवटी जेव्हा जीवशास्त्रज्ञ या बेटावर परतले, तेव्हा हे लहानसे बेट या वॉल लिझार्ड्‌सने पूर्णपणे भरून गेले होते. बेटावरील मूळ पालींच्या तुलनेत या इटालियन वॉल लिझार्ड्‌सची संख्या प्रचंड वाढली होती. पण सर्वात मनोरंजक बाब म्हणजे, या काळात पालींचा शारीरिक आकारही पूर्णपणे बदलला होता.

१९७१ मध्ये एव्हियातार नेव्हो आणि त्यांच्या टीमने इटालियन वॉल लिझार्डच्या ५ जोड्यांना दक्षिण ॲड्रियाटिक समुद्रातील ‘पोड कपिस्ते’ नावाच्या एका लहान खडकाळ ठिकाणाहून उचलून पूर्वेकडील ‘पोड मर्चारू’ बेटावर नेले होते. ते एक प्रयोग करत होते, ज्यामध्ये लहान बेटांदरम्यान प्राण्यांची अदलाबदल करून कोणती प्रजाती वर्चस्व गाजवते हे पाहायचे होते. परंतु, हा प्रकल्प अचानक बंद पडला आणि या १० पालींना त्यांच्या नशिबावर सोडण्यात आले. यानंतर २००० च्या दशकात शास्त्रज्ञ पुन्हा या बेटावर आले.

‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अँथनी हेरेल आणि डंकन इर्शिक यांच्या टीमला असे दिसून आले की हे बेट वॉल लिझार्ड्‌सने भरून गेले होते. या काळात बेटावरील एक मूळ प्रजाती गायब झाली होती. मायटोकॉन्ड्रियल डीएनए चाचणीवरून हे स्पष्ट झाले की या पाली ३ दशकांपूर्वी आणलेल्या त्याच १० पालींच्या वंशज होत्या. या पालींचा आकार आणि शारीरिक रचना लक्षणीयरीत्या बदलली होती. पोड मर्चारू बेटावर राहणाऱ्या वॉल लिझार्डचे डोके पूर्वीपेक्षा मोठे, रुंद आणि उंच झाले होते. या बदलामुळे त्यांच्या चावण्याची ताकद प्रचंड वाढली होती.

या मागचे मुख्य कारण म्हणजे बेटावर बदललेला त्यांचा आहार. मूळ बेटावर असताना या पाली मुख्यत्वे किडे-मकोडे खात असत आणि त्यांच्या आहारात वनस्पतींचा वाटा केवळ ४ ते ७ टक्के होता. मात्र, पोड मर्चारू बेटावर आल्यानंतर त्यांच्या आहारात वनस्पतींचा वाटा वसंतऋतूत ३४ टक्क्यांपर्यंत आणि उन्हाळ्यात ६१ टक्क्यांपर्यंत वाढला. यामध्ये सुमारे अर्धा भाग झाडांच्या पानांचा होता, ज्यामध्ये सेल्यूलोजचे प्रमाण जास्त असते. कडक पाने तोडून खाण्यासाठी त्यांच्या जबड्यात अधिक ताकदीची गरज होती आणि या ताकदीला व स्नायूंना आधार देण्यासाठी त्यांच्या कवटीचा (डोक्याचा) आकार नैसर्गिकरीत्या मोठा झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT