रोहित शर्माला भारतीय टी२० संघाचा नवा कर्णधार बनविण्यात आले आहे. टी२० वर्ल्ड कप नंतर आपण कर्णधार पद सोडत असल्याचे विराट कोहली याने घोषित केले होते. त्यामुळे आता टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला आहे. आता रोहित शर्मा टी२० संघाचे नेतृत्व करेल. तर एकदिवसीय तसेच कसोटी संघाचे कर्णधार पद विराट कोहली याच्याकडेच राहणार आहे. पण एका माजी क्रिकेटपटूने विराट कोहली याने एकदिवसीय तसेच कसोटी संघाचे देखिल कर्णधार पद सोडावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. विराटने सर्व प्रकारातील कर्णधार पद सोडावे आणि आपल्या खेळाकडे अधिक लक्ष केंद्रीत करुन खेळाचा अधिक आनंद लुटावा, असे सुचित केले आहे.
विराट कोहली याने घोषणा केल्याप्रमाणे टी२० संघाचे कर्णधार पद सोडले. तसेच बीसीसीआयने अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा याची कर्णधारपदी नियुक्ती केली. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांच्या जागी अनुभवी, कुशल माजी स्टार क्रिकेट पटू राहूल द्रविड याची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलांमुळे आता कोहली आणि शास्त्री यांचे युग संपले असेच बोलले जात आहे.
कर्णधार म्हणून विराट कोहली याने चांगली कामगिरी केली आहे. याउलट कर्णधार पदावर असताना त्याने चांगल्या धावा केल्या आणि अनेकवेळा संघाला संकटातून बाहेर काढले. त्याच्या कार्यकाळात सर्वच ठिकाणी भारताने आपला दबदबा निर्माण केला. पण, कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली आयसीसीची एक देखिल मोठी मालिका टीम इंडिया जिंकू शकली नाही. त्यामुळे स्वाभाविक विराट कोहली याच्यावरील दबाव वाढत होता.
दुसरीकडे मागील दोन वर्षाच्या काळात रोहित शर्माचा भारतीय संघातील दबदबा वाढला आहे. रोहितने संघाकडून सर्वाधिक धावा आणि शतके ठोकली आहेत. त्याने कसोटी संघात देखिल आपला प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे रोहितकडे पुढील कर्णधार म्हणूनच पाहिले जावू लागले. रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना या संघाचे नेतृत्त्व केलेच शिवाय त्याने पाच वेळा आयपीएल कप जिंकला आहे. त्यामुळे रोहितला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली गेली पाहिजे याबाबतचा दबाव वाढत चालला होता. अखेर टि२० कर्णधार पद विराट कोहलीने सोडण्याचे जाहीर केले आणि रोहित शर्मा कर्णधार बनला. तसेच विराट कोहली याने आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे देखिल कर्णधार पद सोडले आहे.
भारतीय संघासाठी विराट कोहली हा नेहमी ताकदवान खेळाडू राहिला आहे. पण, त्याने सर्वच प्रकारातील कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घ्यावा. तसेच आपल्या खेळाकडे अधिक लक्ष केंद्रीत करुन पुन्हा एकदा भारतासाठी मोठ मोठ्या विक्रमी खेळी कराव्यात. त्याने आपल्या खेळाचा आनंद लुटावा. विराट कोहली अजून भरपूर क्रिकेट खेळू शकतो. त्याने अजून भरपूर काळ देशासाठी खेळावे व त्याचा अधिकाधिक आनंद घ्यावा, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेट पटू आणि जलदगती गोलंदाज शाहीद आफ्रिदी याने म्हटले आहे.
एका खासगी वाहिनीशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, मी रोहित शर्मा सोबत एक वर्ष खेळलो आहे. आयपीएलच्या सुरुवातीला आम्ही डेक्कन चार्जेस सोबत एकत्र खेळलो आहे. रोहित हा मानसिक दृष्ट्या खूपच मजबूत आणि प्रतिभावान खेळाडू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो अत्यंत तणावपूर्ण काळातसुद्धा शांत आणि सयंमी राहू शकतो. तसेच तो हवे तेव्हा आक्रमक देखिल होऊ शकतो. त्याने मुंबईसाठी पाच वेळा आयपीएल जिंकण्याची कामगिरी बजावली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स नेहमीच अत्यंत मजबूत आणि अभेद्य संघ वाटतो. त्यामुळे तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संघाचे कर्णधार पद मजबूतपणे सांभाळू शकतो असे मत शाहीद आफ्रिदी याने व्यक्त केले आहे.
तेहतीस वर्षांच्या विराट कोहली याने बँगलोरचे देखिल कर्णधार पद सोडले आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी जाता जाता संकेत दिले की कोहली हा एकदिवसीय संघाचे देखिल कर्णधार पद सोडेल आणि फक्त कसोटीमध्येच नेतृत्त्व करेल.