इंफाळ, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार 20 दिवसांनंतरही थांबायला तयार नाही. संचारबंदी शिथिल झाल्यानंतर लगेचच बिशनपूर जिल्ह्यातील ट्रोंगलाओबी गावात हिंसाचार उसळला. संशयित कुकी लोकांनी मैतेईंची 3 घरे जाळली. या घटनेचा बदला घेऊन दुसर्या समाजानेही 4 घरे जाळली. त्यानंतर सशस्त्र लोकांनी बिशनपूरमधील मोईरांगच्या काही गावांवर हल्ला केला. दरम्यान, संतप्त जमावाने एका मंत्र्याच्या घरावर हल्ला करून तेथे मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.
हा गदारोळ ऐकून मोईरांग येथील मदत शिबिरातील काही जण बाहेर आले. तेव्हा तोयजाम चंद्रमणी नामक तरुणाच्या पाठीत लागलेली गोळी छातीतून आरपार गेली. या घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मैतेई तरुणांना हुसकावून लावत हिंसाचारावर नियंत्रण मिळवले. जवानांनी कुकींचे अनेक बंकर जमीनदोस्त केले. या घटनेनंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जखमी चंद्रमणीचा नंतर मृत्यू झाला.
मैतेई विरुद्ध कुकी
कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन व युनायटेड पीपल्स फ्रंट यांच्यात केंद्र व राज्य सरकारमधील संवादातून तोडगा काढला जावा, असे कुकी समुदायाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मैतेई समुदायाने म्हटले आहे की, कुकी हे म्यानमारचे घुसखोर आहेत. त्यांना हुसकावून लावले पाहिजे. याउलट मैतेई येथील भूमीचे पुत्र आहेत.
मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड
हिंसाचारामुळे बिशनपूर, इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व जिल्ह्यांतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली. मैतैई समुदायाच्या महिलांनी मंत्री गोविंद कोंथौजम यांच्या निवासस्थानी तोडफोड केली. बिशनपूरमधील हिंसाचारानंतर नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. हिंसाचार उसळल्यामुळे पोलिसांना दंगलखोरांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले.