Latest

भंडाऱ्यातील विवस्त्र नृत्य प्रकरणाची विधान परिषद उपसभापतींकडून गंभीर दखल

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : खडीगंमत व तत्सम कला आयोजनातून होणारे महिलांचे शोषण रोखण्यासाठी आंतरराज्य मानव तस्करीवर प्रतिबंध आणण्याचे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमून 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश आज (दि. २८) विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यंत्रणांना दिले.

भंडारा जिल्ह्यात नुकतेच खडीगंमत कार्यक्रमांतर्गत घडलेल्या हिडिस व महिलांच्या अपमानकारक कृत्याची गंभीर दखल घेत डॉ. गोऱ्हे यांनी मंगळवारी (दि. २८) रवीभवन येथे तातडीची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

भंडारा जिल्ह्यातील खडीगंमत कार्यक्रमात महिलांवर पैसा उधळणे, त्यांचे विवस्त्र नृत्य घडवून आणणे ही घटना महिलांच्या मानवी हक्कांवर गदा आणणारी, अपमानकारक तसेच त्यांना तुच्छ वागणूक देणारी आहे. खडीगंमत व तत्सम कला आयोजनासाठी परवानगी देताना कडक अटी व शर्तीची कसोसीने पूर्तता होणे आवश्यक आहे. नियमांचें उल्लंघन करुन हे आयोजन करण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. ओडिसा, छत्तीसगड आदी राज्यातून अल्पवयीन मुलींना लावणीच्या नावाने आणण्यात आले. प्रत्यक्षात अशा कार्यक्रमांना परराज्यातून मुली आणतांना संबंधीत यंत्रणेची परवानगी घेण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून आंतरराज्य मानव तस्करीची ही घटना दिसून येते. संबंधीत राज्यांना या घटनेसंदर्भात अवगत करुन माहिती घ्यावी तसेच राज्यात अशा आयोजनासाठी होत असलेल्या आंतरराज्य मानव तस्करीवर प्रतिबंध आणावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. यासोबतच अशा आयोजनातील गुन्ह्यांबाबत डान्सबार विरोधी कायाद्यातील विविध कलमांच्या आधारे कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी व राज्यात यापुढे अशा आयोजनांना पायबंध घालण्यासाठी विशेष पोलीस निरिक्षक छेरिंग दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली विधीतज्ज्ञ, पोलीस, सामाजिक संस्था आदींचे प्रतिनिधीत्व असणारी समिती नेमून येत्या 15 दिवसात या समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले. राज्यात अशा आयोजनासाठी पोलीस विभागाच्या स्पष्ट अटी व शर्ती असाव्यात व त्याचे आयोजकांकडून कसोसीने पालन व्हावे, अशा कार्यक्रमांसाठी इतर राज्यांतून येणाऱ्या महिला व मराठी ऐवजी अन्‍य भाषांमधून होणाऱ्या कार्यक्रमासाठी काटेकोर तपासणी व्हावी, आयोजनासाठी अल्पवयीन मुलींना अशा कार्यक्रमांमध्ये सादरीकरणास परवानगी देऊ नये, अशा आयोजन प्रसंगी पोलिसांकडून व्हिडियो रेकॉर्डिंग व्हावे, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे आयोजनास परवानगी देताना सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन व्हावे असे निर्देश त्यांनी दिले. महिला दक्षता समिती व गाव पातळीवर महिला समित्यांनी अशा आयोजनापूर्वी आपली मते संबंधित शासकीय यंत्रनांना कळवावी असेही त्यांनी प्रकर्षाने या बैठकीत सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT