Eknath Shinde Uddhav Thackeray Shiv Sena Unity: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीनंतर या चर्चांना अधिक जोर आला आहे.
कणकवलीत झालेल्या या गुप्त बैठकीत “शहर विकास आघाडी” या नव्या बॅनरखाली दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत उपस्थित होते. दोन्ही गटांमधील मतभेद मिटवून आगामी नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत सर्वांनी सकारात्मक संकेत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
या नव्या आघाडीअंतर्गत संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याची चर्चा बैठकीत झाली आहे. यावर अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांत होण्याची शक्यता असून, दोन्ही गटांनी “एकजुटीचा संदेश” देण्यासाठी एकत्रित रणनीती आखल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची चर्चा प्रत्यक्ष पातळीवर दिसत आहे. त्यामुळे कोकणात तसेच राज्यभरात राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक राजकारणात या “संभाव्य आघाडी”मुळे समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.