Devendra Fadnavis on Ashok Kharat Case:
मुंबई: "तथाकथित तांत्रिक, मांत्रिक, भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची आजही चौकशी सुरू आहे. उद्या यासंदर्भात सखोल निवेदन सभागृहात सादर करेन," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २३) सभागृहात स्पष्ट केले.
अशोक खरात प्रकरणावरून विरोधक आज सभागृहात आक्रमक झाले होते. विरोधकांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात अनेक महिलांची फसवणूक झाली होती, पण समोर यायला कोणीच तयार नव्हते. त्यांना धीर दिल्यानंतर काही महिलांनी तक्रार केली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली असली तरी त्याची तयारी आधीपासून सुरू होती. सभागृहामध्ये उद्या याची सविस्तर माहिती सादर करीन. कारण आजही चौकशी सुरू आहे. कोणीही या प्रकरणाचे राजकारण करू नका. हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणे आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीच भासवून, वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांच इतिकर्तव्य आहे, अशा पद्धतीच त्यांच ब्रेन वॉशिंग करणं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.