नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून गुरुवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. काँग्रेस नेते नसीम खान यांचेही नाव या ठिकाणी चर्चेत होते.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष १७ जागा लढवत आहेत. १७ पैकी १५ उमेदवार काँग्रेसने यापूर्वीच जाहीर केले आहेत. मुंबईमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या दोन लोकसभा क्षेत्रांमधील उमेदवार काँग्रेसने घोषित केले नव्हते. यापैकी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या जागेवर वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, खेर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
काही दिवसांपूर्वीच वर्षा गायकवाड यांनी माजी मंत्री असलम शेख, आमदार अमीन पटेल यांच्यासह दिल्ली दौरा केला होता. मुंबईतील जागा वाटपावर वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दक्षिण मध्य मुंबई मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला यायला हवा होता, अशी त्यांची मागणी होती. या संदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन आम्ही त्यांना आमच्या भावना कळवल्या आहेत, ते योग्य निर्णय घेतील असे म्हटले होते.
काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केल्यानंतर राज्यात काँग्रेस लढत असलेल्या मुंबई उत्तर या एकमेव मतदार संघासाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या काँग्रेस मधून मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असू शकतात.