प्रातिनिधिक छायाचित्र  
Latest

Lok Sabha Election 2024 : अमेठीतून स्मृती इराणी यांच्या विरोधात वधेरा?

दिनेश चोरगे

गांधी कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ, अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदार संघात भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा यांना मैदानात उतरवले जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचवेळी काँग्रेस- समाजवादी पक्ष यांच्या इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असणार, याबाबतची उत्सुकता शिगेला ताणली गेली आहे. केरळच्या वायनाड या आपल्या मतदार संघात 26 एप्रिल रोजी मतदान आटोपल्यानंतर राहुल गांधी अमेठीला भेट देणार आहेत. या भेटीत अमेठीचा उमेदवार निश्चित केला जाईल, असा काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दावा आहे. राहुल गांधी यांच्या भेटीआधीच अमेठीतून कोण लढणार, याविषयी तर्क -वितर्क लावले जात आहेत.

अमेठीतील गौरीगंज गावासह काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये रॉबर्ट वधेरा यांना उमेदवारी मिळणार असल्याबाबत त्यांच्या नावाचे पोस्टर्स झळकले आहेत. अमेठी की जनता करे पुकार… रॉबर्ट वधेरा अब की बार… अशी घोषणा असलेले पोस्टर्स जागोजागी दिसू लागले आहेत. त्यामुळे अमेठीतून रॉबर्ट वधेरा, हेच उमेदवार असतील, असे संकेत मिळाले आहेत. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात अमेठीतून केली जावी, अशी अमेठीतील जनतेचीच इच्छा आहे, असे विधान रॉबर्ट वधेरा यांनी अलीकडेच केले आहे. त्यामुळे रॉबर्ट वधेरा अमेठीतून लढतील.

2019 च्या निवडणुकीत भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा तब्बल 55 हजार 120 मतांनी पराभव केला होता. अमेठीतून हमखास विजय प्राप्त होणार्‍या गांधी कुटुंबीयांसाठी हा फार मोठा धक्का होता. त्यामुळे अमेठीवर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी राहुल गांधी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. काँग्रेस- सप आघाडीचा उमेदवार अजूनही ठरला नसल्याबद्दल भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. बसमध्ये प्रवास करताना जसे रुमाल टाकून आपली जागा धरली जाते, तसेच राहुल गांधी हेही आपली जागा धरण्यासाठी अमेठीला येत आहेत, अशा शब्दांत त्यांनी राहुल यांची खिल्ली उडवली आहे. अमेठी पर जिजाजी की नजर है, साले साहब क्या करेंगे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. अमेठीतील काँग्रेस-सप आघाडीच्या उमेदवार निश्चितीचा विषय देशात अत्यंत चर्चेचा ठरला आहे. राहुल गांधी की रॉबर्ट वधेरा? या नावावरील पडदा लवकरच उठण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT