Latest

Uttarakhand Tunnel Rescue : अजस्र यंत्रे हरली; पण जिंकले मजुरांचे हात!

Arun Patil

उत्तर काशी, वृत्तसंस्था : बोगद्यात शिरायला मी भीत नाही. इथे 800 मि.मी.चा पाईप तरी आहे. आम्ही 600 मि.मी.च्या पाईपमधून घुसूनही रॅट मायनिंग करायला मागे-पुढे पाहत नाही. हे आमचे रोजचे काम आहे. इथे तर लोकांना वाचवायचे होते, झाशी (यूपी) येथील प्रसादी लोधी हे सारे हसत हसत सांगतात.

अडकलेले सर्व मजूर सुखरूप बोगद्याबाहेर पडल्याचा आनंदही अर्थात त्यांच्या या हसण्यामागे आहेच. 21 तासांत लोधी यांच्या रॅट मायनर्स चमूने हातांनी जवळपास 12 ते 13 मीटर बोगदा खणून टाकलेला होता. मोठाल्या मशिनी या मोहिमेत हरल्या होत्या आणि मजुरांचे हातच अखेर जिंकलेले होते.

रॅट मायनर्समध्ये पोहोचल्यानंतर 'एनडीआरएफ'चे बचाव पथक आत गेले. अडकलेले मजूर आणि बचाव पथकादरम्यान 60 मीटरचे अंतर असताना 21 नोव्हेंबरला अमेरिकन ऑगर मशिनने ड्रिलिंग सुरू झाले. 25 नोव्हेंबरला सकाळी 47 मीटरवर मशिनने दगा दिला. रॅट मायनर्सवर मग खोदकामाची ही धुरा आली. रॅट मायनर्सच शेवटी या बचाव मोहिमेचे हीरो ठरले. व्हर्टिकल ड्रिलिंग धोकादायक होतीच, तिचा वेगही कमी होता.

हे रॅट मायनर्स कोण आहेत? कसे काम करतात? बघा…

प्रसादी लोधी यांच्या गाठीला रॅट मायनिंगचा 10-12 वर्षांचा अनुभव आहे. अडकलेले मजूर मात्र ते पहिल्यांदाच बाहेर काढणार होते. मंगळवारी सकाळीही ते आश्वस्त होते. हिलटी नावाची हँड ड्रिलर मशिन त्यांनी आणलेली होती. 800 मि.मी.च्या पाईपमध्ये शिरून त्यांनी हँड ड्रिलिंग सुरू केली. ड्रिलिंग सुरू असताना बाहेर पडणार्‍या ढिगार्‍याला हटविण्या-काढण्याचे काम राकेश राजपूत यांनी केले. त्यांनाही 12 वर्षांचा अनुभव. ते ट्रेंचलॅस कंपनीत पाईप पुशिंगचे काम करतात. ढिगारा वेगाने उपसून ते ट्रॉलीत टाकत आणि ट्रॉली खेचून मग ती बाहेर काढली जाई. राकेश म्हणाले, अडकलेले सगळे माझ्यासारखेच मजूर. माझाही जीव त्यांच्यात अडकलेला… म्हणून माझे हातही भराभर चालले. थकवा जाणवला नाही. घामाकडे मी लक्ष दिले नाही.

भूपेंद्र राजपूतही खोदकामात सहभागी होते. बोगद्याबाहेर मजुरांचे कुटुंबीयही होते. मोहीम फत्ते होत आली तेव्हा अडकलेल्या एका मजुराच्या पित्याला रडू कोसळले. अर्थात, हे आनंदाश्रू होते. अशा 41 कुटुंबांच्या आनंदाश्रूंचे श्रेयही अर्थातच लोधी, राजपूत या रॅट मायनर्सनाच होते…

रॅट मायनिंगमध्ये 3 लोक एकाचवेळी काम करतात. एकजण हाताने ड्रिलिंग करतो. दुसरा पडणारा ढीग उपसतो. तिसरा हा ढिगारा ट्रॉलीत टाकून बाहेर नेतो. ही ट्रॉली रॅट मायनर भूपेंद्र राजपूत यांनीच खास डिझाईन केलेली आहे. एकावेळी 2.5 क्विंटल ढिगारा ती बाहेर वाहून नेते.

15 दिवस 28 जणांच्या मायनिंग टीमने सातत्याने काम केले. यापैकी 15 जण रॅट मायनिंग टीममध्येही होते. ड्रिलिंग वर्कर्स, कटर, वेल्डर, ऑगर ऑपरेटर आणि अभियंतेही या चमूचे घटक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT