पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऑलिंपिक पदक विजेता महान धावपटू उसेन बोल्टला आगामी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. 1 ते 29 जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे ही स्पर्धा रंगणार आहे. नऊ ऑलिंपिक सुवर्ण पदके जिंकणारा बोल्ट हा मूळचा जमैकाचा आहे. 2017 मध्ये लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर तो निवृत्त झाला.
बोल्ट म्हणाला, 'आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून माझी निवड झाल्याने मी रोमांचित आहे. क्रिकेटला माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान राहिले आहे. जागतिक स्तरावर क्रिकेटच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. हा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज संघाने जिंकावा अशी माझी इच्छा आहे.'
'अमेरिकेत क्रिकेटचे सामने खेळवणे ही मोठी गोष्ट आहे. हे जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स मार्केट आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची एक उत्तम संधी आहे. त्यामुळे येथील मैदानावर खेळवल्या जाणा-या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे,' अशीही भावना बोल्टने व्यक्त केली आहे.
युसेन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे. १०० मीटर (९.५७ सेकंद) आणि २०० मीटर (१९.१९ सेकंद) धावण्याच्या शर्यतीतील वैयक्तिक तसेच जमैकन संघातील इतर धावपटूंसोबत ४ x १०० मीटर रीले शर्यतीमधील विश्वविक्रम (३६.८५ सेकंद) बोल्टच्या नावे आहेत. नऊ वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या बोल्टने २००८, २०१२ आणि २०१६ या सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकावली.
जमैकामध्ये जन्मलेल्या बोल्टने त्याचे बालपण आपल्या भावासोबत रस्त्यावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यात घालवले. वयाच्या 12 व्या वर्षी त्याने ठरवले होते की त्याला खेळात करिअर करायचे आहे, पण कोणत्या खेळात करिअर करायचे हे ठरवता येत नव्हते. एके दिवशी बोल्टच्या क्रिकेट प्रशिक्षकाने खेळपट्टीवर त्याचा धावण्याचा वेग पाहिला आणि त्याला धावण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. बोल्टने प्रशिक्षकाच्या सल्ल्याचे पालन करत शर्यतीचे प्रशिक्षण सुरू केले. 2001 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी कॅरेबियन रिजनल चॅम्पियनशिपमध्ये जमैकाकडून खेळताना त्याने 400 मीटर आणि 200 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले. 2002 मध्ये जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये एका सुवर्ण पदकासह तीन पदके जिंकली.
ॲम्बेसेडर म्हणून बोल्ट पुढील आठवड्यात गायक शॉन पॉल आणि केस यांच्यासोबत अधिकृत गाण्याच्या व्हिडिओच्या रिलीजच्या वेळी कॅमिओसह कार्यक्रमाच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील तो सहभागी होणार आहे.
स्पर्धेचा सलामीची लढत यजमान अमेरिकेचा संघ आणि कॅनडा यांच्यात असून 1 जून रोजी डॅलस येथे हा सामना खेळवला जाणार आहे. तर यजमान वेस्ट इंडिजचा पहिला सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध 2 जून रोजी गयाना येथे होणार आहे. या स्पर्धेत 20 संघांमध्ये 29 दिवस एकूण 55 सामने खेळवले जातील, जे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच घडणार आहे.
टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे आयोजित करत आहे. वेस्ट इंडिजच्या 6 शहरांमध्ये एकूण 41 सामने होणार आहेत, जिथे तिन्ही नॉकआऊट सामनेही असतील. तर उर्वरित 14 सामने अमेरिकेतील न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि डॅलस या शहरांमध्ये होणार आहेत. वेस्ट इंडिजची 6 शहरे म्हणजे त्रिनिदाद, गयाना, बार्बाडोस, अँटिग्वा, सेंट व्हिन्सेंट आणि सेंट लुसिया.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी 5 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हेही या गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान त्यांचे सर्व सामने अमेरिकेतच खेळतील.
भारताचे पहिले 3 सामने न्यूयॉर्कमध्ये आणि चौथा सामना फ्लोरिडामध्ये होईल. संघ आपला पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध, दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध, तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध आणि चौथा सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध खेळणार आहे.
अ गटाप्रमाणेच गट ब, क आणि ड मध्येही प्रत्येकी 5 संघ आहेत. सर्व संघ आपापल्या गटात 4-4 सामने खेळतील. गट टप्प्याच्या शेवटी, गुणतालिकेतील शीर्ष 2 संघ सुपर-8 टप्प्यात जातील. या टप्प्यात, 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. येथे दोन्ही गटातील अव्वल 2 संघांमध्ये उपांत्य फेरी खेळली जाईल. उपांत्य फेरीतील दोन विजेत्या संघांमध्ये 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
अमेरिकेला प्रथमच आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. 2028 ऑलिम्पिक स्पर्धाही अमेरिकेत होणार असून त्यात क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पाहता आयसीसीने अमेरिकेत टी-20 विश्वचषक आयोजित करण्याला प्राधान्य दिले. अमेरिके बरोबरच टी-20 विश्वचषकही वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे, 2010ची स्पर्धाही येथे खेळवण्यात आली होती. शेवटचा विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झाला होता.