UP election 2022 : समाजवादी म्हणवणारे लोक फक्त परिवारवादी, PM मोदींचे टीकास्त्र 
Latest

UP election 2022 : समाजवादी म्हणवणारे लोक फक्त परिवारवादी, PM मोदींचे टीकास्त्र

रणजित गायकवाड

नोएडा; पुढारी ऑनलाईन : UP election 2022 : 'उत्तर प्रदेशातील जनतेने पडद्याआड राहून दंगलखोर, माफियांना राज्याची सत्ता काबीज करू देणार नाही, असा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. स्वातंत्र्यानंतर, यूपीच्या जनतेने अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. इथे अनेक सरकारे निर्माण झाली आणि ढासळतानाही पाहिली. पण यंदाची निवडणूक वेगळी आहे. ही निवडणूक सुरक्षा, सन्मान आणि समृद्धीची ओळख जपण्यासाठीची आहे. ही निवडणूक हिस्ट्री शीटर्स बाहेर ठेवून नवा इतिहास रचण्यासाठीची आहे', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यांच्यावर केली. ते मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, हापूर आणि नोएडा येथील मतदारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.

पीएम मोदी म्हणाले, 'तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की २०१७ पूर्वी जे सरकार होते, त्यांनी एक्स्प्रेस वेच्या नावाखाली लूट केली. पूर्वांचल आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाला आहे. स्वत:ला समाजवादी म्हणवणारे लोक फक्त परिवारवादी आहेत. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात विकास हा फक्त कागदावरच होता. हे वारंवार सिद्ध झाले आहे. ५ वर्षांपूर्वीपर्यंत या माफियांनी केंद्रीय योजनांचा लाभ यूपीतील गरीब, दीन, मागासलेल्या लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही. केंद्रीय योजनांमध्ये त्यांची मनमानी चालली नाही, भ्रष्टाचार झाला नाही, म्हणून त्यांनी त्या योजनांना ब्रेक लावला. यंदा त्यांना संधी मिळाली तर हे खोटे समाजवादी लोक शेतकर्‍यांना मिळणा-या हजारो कोटींच्या मदतीत अडथळा आणतील. हे खोटे समाजवादी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाणारे एमएसपीचे पैसे थांबवतील. कोरोनाच्या काळात तुम्हाला जे मोफत रेशन मिळत आहे, ते हे खोटे समाजवादी हडपतील आणि युपीच्या जनतेला उपाशी ठेवतील. (UP election 2022)

ते पुढे म्हणाले की, 'खोटे समाजवादी मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्याच्या तयारीत असून राज्यातील स्थावर मालमत्ता माफियांना देणार आहेत. नोएडा-गाझियाबादच्या लोकांपेक्षा या खेट्या समाजवाद्यांना कोण चांगले ओळखते? रेशन माफियांपासून कमिशन माफियांपर्यंत, कंत्राटी माफियांपासून खाण माफियांपर्यंत, खोटे समाजवादी त्यांच्या जुन्या अवतारात परत येण्याच्या तयारीत आहेत', असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. (UP election 2022)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने २१ साखर कारखान्यांची विक्री केली होती, परंतु गेल्या ५ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये एकही साखर कारखाना विकला गेला नाही. या ५ वर्षांत, कोरोनाच्या काळातही सर्व ११९ साखर कारखाने सुरू होते. भाजप सरकार जे बोलते तेच करते. (UP election 2022)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT