पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याला अवकाळी पावसाने जोरदार फटका दिला असून, वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुणे, नगर, रायगड, अलिबाग, रत्नागिरी जिल्ह्यांनाही अवकाळीचा फटका बसला असून, शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवल्याने शेतकरी पार हवालदिल झाला आहे.
राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत:, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यांत वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कापूस, कांदा व फळपिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांवर ऐन होळीच्या सणात नवे विघ्न ओढवले. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, गहू आणि डाळिंबासह भाजीपाला पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली.
नाशिक जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी हजेरी
अवकाळी पावसाने मंगळवारी (दि. 7) सलग तिसर्या दिवशीही जिल्ह्याच्या विविध भागांत हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने काढणीला आलेला गहू, कांदा, द्राक्ष पिकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे; तर या पावसाने चार जनावरे दगावली असून, पाच घरांचे नुकसान झाले. दरम्यान, बुधवारी (दि. 8) जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.
नाशिक शहर व परिसरात सोमवारी (दि. 6) मध्यरात्री 1 वाजता वादळी वार्यांसह व विजेच्या कडकडाटासह सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कायम होता. त्यानंतर दिवसभर पावसाने उसंत घेतली. मात्र, मध्यरात्री झालेल्या वादळी पावसाने सलग दुसर्या दिवशीही अनेक भागांमध्ये विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
तसेच शेतीपिकांना फटका बसला आहे. काढणीला आलेला कांदा, गहू, द्राक्ष, बाजरी, भाजीपाल्यासह पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने जिल्ह्यात चार जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये येवला व सिन्नरमध्ये प्रत्येकी एक गाय तसेच सुरगाण्यात दोन शेळ्या गतप्राण झाल्या. याशिवाय बागलाणला दोन तसेच इगतपुरी, निफाड व दिंडोरीत प्रत्येकी एक अशा एकूण पाच घरांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मराठवाड्यात तीन जिल्ह्यांना फटका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच ते सात मार्चदरम्यान 7.8 मि.मी. अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने गहू, आंबा, मोसंबी या पिकांचे नुकसान झाले. वीज कोसळून जिल्ह्यात पाच जनावरे मृत्युमुखी पडली असून, त्यात दोन बैल, दोन गायींचा समावेश आहे. पैठण, वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यांत पिकांची मोठी हानी झाल्याचे झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. याशिवाय गंगापूर तालुक्यातही पावसामुळे मोठी हानी झाली आहे. जालना व हिंगोली जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.
नगर जिल्ह्यात कांदा, फळबागांचे नुकसान
नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गारपीट झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागासोबतच पारनेर तालुक्यातही गारपीट झाली. यामुळे शेतातील गहू, कांदा आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. रविवारी आणि सोमवारी रात्री तसेच मंगळवारीही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या आकारातील गारा पडल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
कोकणातही अवकाळीची हजेरी; आंबा बागायतदार हवालदिल
ऐन होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वार्यासह हजेरी लावल्याने होळी सणाच्या उत्साहावर काही ठिकाणी विरजण पडले; तर आंबा बागायतदार या पावसामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, मुरूड तालुक्यातील शिघ्रे गावातील रहिवासी नथुराम जानू माळी यांच्या घरावर सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही.
अवकाळी पावसाने अलिबागसह श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, मुरूड येथे हजेरी लावली; तर दिवसभर हवामान ढगाळ झाले होते. अवकाळी पाऊस भाजीपाल्यासाठी पोषक असला, तरी त्याचा विपरीत परिणाम ऐन तयार होण्याच्या टप्प्यातील आणि तयार झालेल्या हापूस आंब्यावर होणार असल्याची माहिती आंबा बागायतदार दशरथ म्हात्रे यांनी दिली. पावसामुळे आंब्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
गहू, हरभर्याचा घास हिरावला!
गहू, हरभरा, कांदा, आंबा, संत्रा, डाळिंब, द्राक्षे यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गहू आणि हरभरा काढणीला आला असताना पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. द्राक्ष पिकाचीही मोठी हानी झाली असून, पावसामुळे द्राक्षमणी फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. शेकडो एकरवरील गहू पूर्णपणे झोपला आहे, तर आधीच त्रस्त असलेला कांदा उत्पादक शेतकरी आता पावसामुळे संकटात सापडला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकार्यांशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.