ऑस्ट्रेलियातील युनायटेड कप टेनिस स्पर्धेत (United Cup Tennis) शनिवारी अनपेक्षित निकालामुळे काहीशी सनसनाटी निर्माण झाली. स्पेन च्या पहिल्याच सामन्यात अव्वल, ज्येष्ठ आणी श्रेष्ठ खेळाडू नदालला इंग्लंडच्या केमेरॉन नोरीने 3-6, 6-3, 6-4 असे सपशेल चितपट करून खळबळ उडवून दिली. याबरोबरच जर्मनीचा दिग्गज खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव्हला झेकोस्लोव्हाकियाच्या जिरी लेहेकाने 6-2, 6-4 असे सहज पराभूत करून चकित केले. तथापि दिवसभराच्या खेळात संमिश्र चित्र पाहायला मिळाले. अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांना धूळ देखील चारली.
सामन्यानंतर क्रीडा समीक्षकांशी संवाद साधताना नदालने केमेरॉन नोरीची मुक्तकंठाने स्तुती केली. नदाल म्हणाला, नोरीने लाजवाब खेळ केला. त्याचे खेळावर पूर्ण नियंत्रण होते. त्याला मी 100 गुण देईन. मी निराश नाही. मला अजून गतिमान खेळणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियन ओपनपर्यंत मी भरात येईन, असा आत्मविश्वास आहे.
जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर अलेक्झांडर झ्वेरेव्ह म्हणाला, दुखापतीनंतर सात महिन्यांनी खेळणे हे एक आव्हान होते. माझ्या दर्जाप्रमाणे खेळ झाला नाही. मला लवकर थकीत असल्याचे जाणवत होते. टेनिस हे माझ्या जीवनाचे सर्वस्व आहे. मी कष्ट आणि सराव करून सर्वोच्च दर्जाचा खेळ करीन, असा मला विश्वास वाटतो. (United Cup Tennis)
अव्वल मानांकित पोलंडची इगा स्विआटेक हिने कझाकिस्तानच्या युलिया पुतीन्तसेवाचा एका तासात 6-1, 6-3 असा फडशा पाडला. झेकोस्लोव्हाकियाची मेरी बाऊजकोवा जर्मनीच्या जूल निमेअर पेक्षा 6-2, 7-5 अशी सरस ठरली. बल्गेरियाचा ग्रीगोर डिमिट्रोव्ह बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीनवर 6-4, 7-5 अशी मात करण्यात यशस्वी झाला. सिडनी येथील सामन्यात 'ड' गटात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3-2 अशी चुरस आहे. 'क' गटात अमेरिका 4 विजय, झेकोस्लोव्हाकिया 3 विजय आणि जर्मनी 2 पराजय अशी स्थिती आहे.
उदय बिनीवाले