Latest

जगभरात असलेल्या ‘या’ लग्नातील भन्नाट प्रथा!

निलेश पोतदार

लग्नातील रितीरिवाजचार केला तर आपल्या भारतातच अनेक प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक राज्यात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती, प्रकार आहेत. त्यावरून जगभरात किती पद्धती, रितीरिवाज असू शकतात याची कल्पनाच केलेली बरी! काही प्रथा तर अतिशय अनोख्या आणि विचित्र वाटणार्‍या आहेत. अशाच काही भन्नाट प्रथांची ही माहिती…

हसायचे नाही :

मध्य आफ्रिकेतील कांगो देशात लग्नाच्या दिवशी वधू-वरांना हसण्यास मनाई असते. आयुष्यातील इतका महत्त्वाचा, आनंदी दिवस त्यांना सुतकी चेहरा करून घालवावा लागतो! एरव्ही लग्नसमारंभात वधू-वरांचे हास्याने उजळलेले चेहरे आपण पाहत असतो, त्यांची छायाचित्रे घेत असतो; पण कांगोमध्ये याबाबत वेगळ्याच धारणा आहेत. लग्नाच्या दिवशी हसणारी जोडपी लग्न, संसार याबाबत गंभीर नसतात असा तिकडे समज आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशी विधींना सुरुवात झाल्यापासून रिसेप्शनपर्यंत त्यांना हसण्यास मनाई असते!

खांद्यावर रोट्यांचे संतुलनः

आर्मिनिया देशात लग्नाच्या दिवशी वधू-वरांना एक विचित्र परीक्षा द्यावी लागते. ज्यावेळी वधू आणि वर घरी पोहोचतात त्यावेळी वराची आई त्यांना 'लवाश' नावाची एक प्रकारची रोटी आणि मध देते. वधू-वरांना आपल्या खांद्यांवर या लवाशला ठेवून ते खाली न पाडता त्याचे संतुलन साधायचे असते. असे केल्याने नवपरिणित जोडप्याला वाईट नजर लागत नाही, असे तिकडे मानले जाते. शिवाय वैवाहिक जीवनातील गोडवा वाढावा यासाठी प्रतीकात्मकरीतीने तिथे नवदाम्पत्याला मध खाण्यास दिला जातो.

व्हेलचा दात :

दक्षिण पॅसिफिक महासागरातील फिजी देशात वधूपित्याकडे मुलीचा हात मागत असताना भावी सासर्‍याला व्हेल माशाचा दात भेट म्हणून द्यावा लागतो. भावी जावयाची कर्तबगारी अशा पद्धतीने तिथे जोखली जाते. व्हेल माशांचा अवाढव्य आकार पाहताच एखाद्याची घाबरगुंडी उडू शकते. अशा माशाचा दात आणून तो भेट म्हणून देणारा वीर आपल्या लेकीसाठी आदर्श पती ठरू शकतो, अशी तिकडे मान्यता आहे!

वधूबरोबर नृत्यासाठी शुल्क :

क्यूबामध्ये लग्नाच्या दिवशी एक अनोखी प्रथा पाळली जाते. या दिवशी जो कुणी वधूबरोबर नृत्य करतो त्याला तिच्या पोशाखावर पिनेच्या सहाय्याने नोट लावावी लागते. यामुळे नवदाम्पत्यावर असलेला लग्न व हनीमूनच्या खर्चाचा भार थोडा कमी होतो अशी त्यामागील एक व्यावहारिक कल्पना आहे. वधूही अनेकांबरोबर नाचून वधूवेशाचे रूपांतर नोटांच्या पोशाखात करू शकते!

वधूचे रडणे :

आपल्याकडे लग्नानंतर पाठवणीवेळी वधूचे रडणे ही एक नैसर्गिक बाब आहे. मात्र, चीनच्या तुजिया समुदायात याबाबत भलताच प्रकार केला जातो. तिथे लग्नाच्या एक महिना आधीपासून नवरीला रडत बसावे लागते. दिवसातून एक तास वधूने रडावे हा तेथील दंडकच आहे! दहा दिवसानंतर तिच्यासमवेत बसून तिची आईही रडू लागते आणि त्याच्या दहा दिवसांनंतर तिची आजीही बसून रडू लागते. महिनाअखेरपर्यंत कुटुंबातील सर्व बायका आळीपाळीने नवरीजवळ बसून रडून घेतात. विशेष म्हणजे ही रडारड लग्नाचा आनंद व्यक्त करण्याची एक पद्धत असल्याचे तिकडे मानले जाते!

खरकटे काढा :

जर्मनीत लग्नाच्या दिवशी एक अनोखी परंपरा पाळली जाते. या दिवशी लग्नाच्या मेजवानीत सहभागी झालेल्या लोकांनी फैलावलेला कचरा आणि त्यांच्या खरकट्या थाळ्या वधू-वरांना साफ कराव्या लागतात. यामुळे नवपरिणित जोडप्याला लागलेली वाईट नजर दूर होते आणि जीवनातील सर्व आव्हानांना जोडीने तोंड देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते असे मानले जाते.

नवरदेवाचा टाय कापणे :

लग्नात अनेक हौशे-गवशेही असतात. विशेषतः अनेक ठिकाणी नवरदेवाचे टारगट मित्र, भाऊ नको तो आगाऊपणा करीत असतानाही दिसून येतात. स्पेनमध्ये मात्र याबाबत विशेष प्रथाच आहे. तिथे लग्नाच्या दिवशी नवर्‍याचे मित्र त्याचा टाय कापून पाहुणे मंडळींना विकतात. यामध्ये नवरदेवासाठी एक आनंदाची बाब म्हणजे टाय विकून आलेले पैसे वधू-वरांनाच दिले जातात! हे पैसे वाढवण्यासाठी काही छोट्या-मोठ्या वस्तूही-विकल्या जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT