Latest

Dawood Ibrahim : विषप्रयोग, हृदयविकाराचा झटका, कोविड : जाणून घ्या कितीवेळा झाला दाऊदचा ‘मृत्यू’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dawood Ibrahim : मुबंईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मृत्यूबाबत मोठी बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली. दाऊदवर विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले. दरम्यान त्याच्या मृत्यूबाबतही अनेक बातम्या समोर येत आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. तसेच त्याला विष कोणी दिले याची माहितीही पुढे आलेली नाही. याआधीही अनेकवेळा दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत. पण त्याची पुष्टी कधीच होऊ शकली नाही.

2016 मध्येही गँगरीनमुळे मृत्यू?

2016 मध्येही दाऊद आजारी असल्याची चर्चा होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार दाऊदला 8 वर्षांपूर्वी गँगरीन झाल्याची चर्चा होती. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार, त्याला घरात काही तरी लागल्याने पायाला जखम झाली. मधुमेहामुळे ही जखम बळावत गेली आणि नंतर त्याचे रूपांतर गँगरीनमध्ये झाले. ज्यामुळे त्याचा पाय कापावा लागल्याचा दावा करण्यात आला होता. नंतर बातमी आली की दाऊदचा गँगरीनमुळे मृत्यू झाला. मात्र या सर्व गोष्टी केवळ अफवाच निघाल्या.

2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू?

2017 मध्ये दाऊदला पाकिस्तानात हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. त्याला ब्रेन ट्युमर असून त्यामुळेच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर दाऊदला कराचीतील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. (Dawood Ibrahim)

2020 मध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू?

2020 मध्ये दाऊद इब्राहिमचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानमध्ये आली होती. मात्र, त्यावेळीही अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. जून 2020 मध्ये एजन्सींच्या हवाल्याने बातम्या आल्या होत्या की दाऊद आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्या दोघांनाही उपचारासाठी कराचीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दाऊदचे वैयक्तिक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त त्याचा भाऊ अनीस इब्राहिमने फेटाळून लावले होते. अनीसने दावा केला की त्याच्या भावासह कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी आहेत आणि कोणीही रुग्णालयात दाखल नाही.

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदचे नाव चर्चेत आले. या बॉम्बस्फोटात 250 हून अधिक लोक मारले गेले. त्यानंतर दाऊदने त्याचा भाऊ अनीसह भारतातून पळ काढला. त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ला, खून, अपहरण, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. 2011 मध्ये, एफबीआयच्या यादीत त्याच्या नावाचा जगातील तिसरा सर्वात वाँटेड फरारी गुन्हेगार म्हणून समावेश करण्यात आला. दाऊदची डी-कंपनी बेटिंग, शस्त्र पुरवठा, ड्रग्ज, बनावट चलन इत्यादींसह अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेली आहे. परदेशातही त्याच्या अनेक मालमत्ता आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT