Latest

Shreyas Iyer : ‘बीसीसीआय’ने बडगा उगारताच श्रेयस अय्यर रणजी खेळणार

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, 'बीसीसीआय' सचिव जय शहा यांच्याकडून खेळाडूंना वारंवार देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला गेला; पण इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता 'बीसीसीआय' या दोन खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळणार असल्याची चर्चा सुरू होती. याचा सुगावा लागताच दुखापतीचे सोंग घेतलेला श्रेयस अय्यर रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यास तयार झाला असून, तो मुंबईकडून उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. 2 मार्चपासून तामिळनाडू संघाविरुद्धचा हा सामना सुरू होणार आहे आणि त्यात खेळणार असल्याचे श्रेयसने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. (Shreyas Iyer)

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा सदस्य असलेल्या श्रेयसला काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याला दुखापतीचे कारण देऊन संघातून वगळले गेले. त्यानंतर तो रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणे अपेक्षित होते. परंतु, त्याने अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याचे सांगून ती मॅच खेळला नाही; पण त्यानंतर 'एनसीए' अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला कोणतीच नवीन दुखापत नाही आणि तो तंदुरुस्त असल्याचा अहवाल सांगितला. त्यामुळे श्रेयसचा खोटारडेपणा उघड झाल्याची चर्चा रंगली. त्यानंतर 'बीसीसीआय'च्या आक्रमक पवित्र्याच्या बातम्या समोर आल्या. (Shreyas Iyer)

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींत श्रेयसला 35, 13, 27 व 29 अशा धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्याची गच्छंती निश्चित होती. त्याच्याजागी रजत पाटीदारला संधी दिली गेली आणि तोही अपयशी ठरला. श्रेयसने 14 कसोटी सामन्यांत 1 शतक व 5 अर्धशतकासह 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत.

आता श्रेयस अय्यर रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. 2 मार्चपासून तामिळनाडू संघाविरुद्धचा हा सामना सुरू होणार आहे आणि त्यात खेळणार असल्याचे श्रेयसने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. भारत-इंग्लंड पाचवी कसोटी 7 मार्चपासून धर्मशाळा येथे खेळवली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT