Uncategorized

९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : चिमूरला मिळाले होते तीन दिवसांचे स्वातंत्र्य!

मोहन कारंडे

महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात मोठे आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य. 14 ते 16 ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून संपूर्ण जगाला सांगितले होते. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. संतप्त नागरिकांनी 16 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी विश्रामगृहाला आग लावली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा गोळीबार केल्यामुळे अनेकजण शहीद झाले. चिमूरच्या 200 स्वातंत्र्यसैनिकांवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात खटला चालला. 21 क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावली. 26 जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

विदर्भातील अनेक मोठ्या घटना ऑगस्ट महिन्यातील आहेत; पण या घटनांकडे दुर्लक्षच झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, वर्धा जिल्ह्यातील आष्टी, अमरावती जिल्ह्यातील यावली येथील स्वातंत्र्य संग्राम इतिहासात अजरामर आहे.

विदर्भातील या लढ्याला प्रखर आणि धगधगता निखारा देण्याचे काम तुकडोजी महाराज यांनी केले. प्रभावी भजनांतून तसेच भाषणांतून राष्ट्रीयतेची जाणीव करून देणार्‍या राष्ट्रसंतांनी 1942 च्या लढ्यात अभूतपूर्व असा रंग भरला. बासरी सोडून द्या, बना सुदर्शनचक्रधारी' असा संदेश ते देत होते. 'अब काहे को धूम मचाते' या भजनातून इंग्रजांना इशारा देत महाराज म्हणाले, 'झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना । पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेंगी किनारे ॥' आरती मंडळाचे सूत्रबद्ध काम गोपनीय पद्धतीने शामरावदादा मोकद्दम यांच्या मार्गदर्शनात चालले होते. प्रत्यक्ष आष्टीत महाराजांनी प्रथम 14 ऑगस्ट 1934 रोजी गांधी चौकात ब्रिटिशांच्या रोषाची तमा न बाळगता गोपाळराव वाघ, मल्लिकार्जुन आप्पा गंजीवाले यांच्या विनंतीवरून सर्वप्रथम तिरंगा झेंडा फडकावला. दुसर्‍यांदा 2 जून 1940 रोजी महाराजांनी तिरंगा फडकावला. यावली हे तर राष्ट्रसंतांचे जन्मगावच. गांधीजींनी 8 ऑगस्टला 'भारत छोडो' हा नारा दिल्यानंतर 8 आणि 9 ऑगस्ट रोजी महाराजांचे आष्टीला गांधी चौकात भजन झाले. भजनातून आरती मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायक मार्गदर्शन करून 'पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगी सेना' हा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचा सल्ला त्यांनी दिला. 10 ऑगस्ट रोजी तळेगाव (शा.पं.), खरांगणा (मोरांगणा) वर्धा आणि 12 ऑगस्ट रोजी हिंगणघाट, असा झंझावती भजन आणि भाषणांचा कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील 1942 च्या क्रांतिलढ्याचे रणशिंगच त्यांनी या माध्यमातून फुंकले गेले. 13 ऑगस्टला ते चिमुरात पोहोचले. आष्टी आणि चिमूरला क्रांती घडली तो दिवस होता नागपंचमी. 16 ऑगस्ट 1942. आष्टी येथील पोलिस ठाण्यावर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम आधी 17 ऑगस्ट रोजी ठरला होता. परंतु, 16 ऑगस्टला आंदोलन तीव्र झाले. या लढ्यात अनेकांना हौतात्म्य आले, तर काहींना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

– राजेश्वर येरणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT