दक्षिण सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. शनिवारच्या आठवडी बाजारात पाच ते सहा मोबाईल चोरीला जात आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार देऊन चोरांचा तपास लागेना, चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बाजारात भाजीपाला खरेदी करताना किंवा पैसे देतानाची संधी साधुन चोरटे मोबाईल लंपास करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागतोय. यापूर्वीही अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. या बाबत पोलिसांत तक्रार देखील दिली.
होटगी अठवडी बाजारात आजुबाजुच्या गावातील शेतकरी भाजीपाला, कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात. ताजी आणि चांगला भाजीपाला माफक दरात मिळतो म्हणून शेजारील गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात आणि आपला मोबाईल फोन हरवून बसतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्तातला भाजीपाला खरेदीच्या नादात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. पोलिसांनी या अठवडी बाजारातील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.