सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनी मुदतीत अर्ज दाखल न केल्याने ते 50 हजारांच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. अशा नातेवाईकांनी तक्रार निवारण समितीमार्फत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना-19 आजारामुळे सोलापूर जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह सहाय्य राज्य शासनामार्फत देण्यात येते. 20 मार्च 2022 पासून पुढे कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना अर्ज करण्यास तिथून पुढे 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र अनेकांच्या नातेवाईकांना मुदतीत अर्ज करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अशा मृतांच्या नातेवाईकांनी आता मुदतीनंतर तक्रार निवारण समितीमार्फत अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार यांनी केले आहे
कोरोना-19 या आजारामुळे 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास 24 मार्च 2022 पासून 60 दिवसांच्या आत म्हणजे 24 मे 2022 पर्यंत आणि 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत या योजनेखाली अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र अनेकांना मुदतीत अर्ज करणे शक्य झाले नाही. त्यामुळे असे लोक या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी मुदतीच्या नंतरचे अर्ज तक्रार निवारण समिती (ॠठउ) मार्फत करता येतील. या योजनेसाठी ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे, त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे नातेवाईकांनी चुकीच्या पद्धतीने अथवा दोन वेळा दावा दाखल करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.