सोलापूर : पुढारी वृत्तसेवा आगामी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या 77 गटांसाठी, तर 154 पंचायत समितीच्या गणांसाठीचा प्रारुप आराखडा सोमवारी जाहीर झाला. त्यामुळे इच्छुकांची प्रतीक्षा संपली असून ते कामाला लागले आहेत. आता कोणता जिल्हा परिषद गट आणि आणि पंचायत समितीचा गण महिला आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी राखीव होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हा प्रारुप निवडणुकीचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील 1 जिल्हा परिषदेच्या 77 गटांसाठी, तर 11 पंचायत समितीच्या 154 गणांसाठी अंतिम गट आणि गण रचनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून यावर निवडणूक विभागाचे काम सुरू होते.त्यासाठीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावर हरकती, दावे यांची शहानिशा झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार या प्रारुप आराखड्याला अंतिम प्रसिद्धी देण्यात आली आहे.
यामध्ये अनेक तालुक्यांतील लोकसंख्या आणि मतदारसंख्या गृहीत धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गण तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी नगरपालिका आणि नगरपरिषदा निर्माण झाल्याने पूर्वीचे गट संपुष्टात आले आहेत, तर अनेक ठिकाणी नव्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गण निर्माण करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत पूर्वी 68 गट होते. त्यामध्ये नव्याने 9 गट वाढले आहेत, तर विविध तालुक्यांतील 11 पंचायत समितींमध्ये 136 गण होते, त्यामध्ये 18 गण वाढले आहेत. त्यामुळे नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप आराखड्यात आता पंचायत समितीसाठी 154 गण झाले आहेत.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 27 लाख 98 हजार 843 एवढी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामध्ये 4 लाख 22 हजार 726 लोकसंख्या अनुसूचित जाती प्रवर्गाची आहे, तर 47 हजार 906 इतकी लोकसंख्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची आहे. त्यानुसार आता विविध जाती प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत होणार आहे.त्यामुळे कोणता जिल्हा परिषद गट कोणत्या जाती प्रवर्गासाठी राखीव होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, तर ओबीसी आरक्षणाचे काय होणार याचीही उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागून राहिली आहे.
या तालुक्यात वाढले गण आणि गट
उत्तर सोलापूर – 1 गट आणि 2 गण, दक्षिण सोलापूर -1 गट, 2 गण, अक्कलकोट – 1 गट, 2 गण, माढा – 1 गट, 2 गण, करमाळा – 1 गट, 2 गण, मंगळवेढा -1 गट, 2 गण, सांगोला – 1 जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समितीचे गण वाढले आहेत, तर पंढरपूर तालुक्यात 2 जिल्हा परिषद गट आणि 4 पंचायत समितीचे गण वाढले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात आता 11 जि.प. सदस्य, तर 22 पंचायत समिती सदस्य असणार आहेत.
तालुका पूर्वीचे गट पूर्वीचे गण नवे गट नवे गण
उत्तर सोलापूर 2 4 3 6
बार्शी 6 12 6 12
दक्षिण सोलापूर 6 12 7 14
अक्कलकोट 6 12 7 14
माढा 7 14 8 16
करमाळा 5 10 6 12
मोहोळ 6 12 6 12
पंढरपूर 8 16 10 20
मंगळवेढा 4 8 5 10
सांगोला 7 14 8 16
माळशिरस 11 22 11 22
एकूण 68 136 77 154