सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा फायनान्समधील जुन्या गाड्या घेऊन त्या जास्त रकमेने विक्री करून मोबदला देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणार्यास मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सात वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सचिन रामचंद्र गडदे (रा. दमाणी नगर, सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अनिल भाकरे (रा. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर बझार पोलिस ठाण्यात त्यांच्यासह अनेकांची 1 कोटी 21 लाख 42 हजार 500 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनिल भाकरे यांच्यासह अनेकांना श्रीराम फायनान्समधील जुन्या गाड्या घेऊन त्या जास्त रकमेने विक्री करून मोबदला देतो असे सांगून सचिन गडदे याने 1 कोटी 21 लाख 42 हजार 500 रुपयांना फसविले. याबाबत अनिल भाकरे यांच्या फिर्यादीवरुन 27 जुलै 2019 रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी करून आरोपी गडदे यास अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिली. याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी यांच्यासमोर झाली.
याप्रकरणी सरकारच्यावतीने 17 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुरावा तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी आरोपी गडदे यास 7 वर्षे सश्रम कारावास तसेच 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारच्यावतीने अॅड. अमर डोके यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस नाईक ज्योती बेटकर, पोलिस शिपाई अमर शेळके यांनी काम पाहिले.