Uncategorized

 सुभाष देसाई यांच्याकडून औद्योगिक प्लॉटमध्ये घोटाळा : इम्तियाज जलील 

दिनेश चोरगे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा :  एमआयडीसीमधील उद्योगासाठीच्या जागा नियमबाह्यपणे रहिवासी आणि व्यावसायिक हेतूसाठी देऊन माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत केला.

उद्योगासाठी दिलेल्या जागा उद्योग उभारणीसाठी न वापरता, बिल्डरच्या घशात घातल्या. त्यासाठी नियमांचे उल्लंघन केले गेले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली, तर मोठा घोटाळा समोर येईल. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही चौकशी करावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.

ते म्हणाले की, शहरातील चिकलठाणा, वाळूज येथील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग उभारणीसाठी सवलतीच्या दरात उद्योजकांना प्लॉट, जमिनी देण्यात आल्या. गेल्या सरकारमध्ये सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना त्यांनी औद्योगिक प्लॉटचे रूपांतर नियमबाह्यरीत्या करून ते बिल्डरांना देण्यात आले होते. ज्या उद्देशासाठी ही जमीन घेण्यात आली होती, त्याऐवजी त्या जमिनीचे कन्व्हर्जन करून प्लॉट निवासी, कमर्शियल करण्यात आले. यामध्ये प्रत्येक प्लॉटसाठी दोन कोटी रुपये घेण्यात आले. औरंगाबादेत एका वर्षभरात असे 52 अर्ज देण्यात आले आहेत. देसाई यांचा मुलगा बिल्डरांशी संपर्क करून दर ठरवत होता, असा आरोपही जलील यांनी केला. नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे व राज्याच्या इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा प्रकार झाला असण्याची शक्यता असल्याचेही जलील यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT