सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात काही भागांत पाऊस झाल्याने तेथे आता खरिपातील पेरणीला वेग आला आहे. शेतकर्यांना बी-बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेऊन खते व बियाणांचा मुबलक पुरवठा करा, बोगस बियाणे तसेच खतांचा साठा करून चढ्या भावाने विक्री करणार्यांवर कारवाई करा, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकार्यांना दूरध्वनीवरून दिली, अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (दि.28) मतदार संघातील पीक पेरणीचा आढावा घेऊन अधिकार्यांना निर्देश दिल्याचे यात म्हटले आहे. पत्रकात म्हटले आहे, की पीक कर्जाच्या भरवशावर शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असतो. त्यामुळे बँकांनी कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता पात्र शेतकर्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करावे, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिल्या. मतदारसंघात पाहिजे त्या प्रमाणात अद्याप पर्जन्यवृष्टी झाली नाही. काही शेतकर्यांनी धूळ पेरणी केली असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ज्या भागात पाऊस झाला तेथे खरीप पीक लागवडीसाठी वेग आला आहे. कृषी व महसूल विभागाने सतर्क राहिले पाहिजे, असे स्पष्ट करीत बँकांनीदेखील पीककर्जाच्या संचिका तत्काळ निकाली काढून शेतकर्यांना वेळेत कर्जपुरवठा करावा, असे निर्देश दिल्याचे या पत्रकात म्हटले आहे