Uncategorized

सिंधुदुर्ग : चष्म्याच्या बॉक्सवरून पटली मृतदेहाची ओळख

मोहन कारंडे

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : मळगाव येथे रेल्वे रुळावर मृतावस्थेत सापडलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव ज्योती चंद्रकांत गोलतकर (रा. चिंदर- सडेवाडी, ता. मालवण)असे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. घटनास्थळी सापडलेल्या चष्माच्या बॉक्सवरुन मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

मळगाव रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या पुलाखाली सोमवारी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ही महिला वयोवृद्ध असून रेल्वे गाडीची धडक बसून तिचा मृत्यू झाला असावा किंवा तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवली होता. या महिलेच्या मृतदेहा सोबत असलेल्या पिशवीत एक चष्म्याचा बॉक्स सापडला होता. हा बॉक्स मुंबई- मालाड येथील चष्माच्या दुकानाचा होता. बॉक्सवर नमूद फोन नंबरवर दुकानदाराशी सावंतवाडी पोलिसांनी संपर्क साधला असता, तेथून पोलिसांना सदर महिलेच्या मुलाचा नंबर मिळाला. पोलिसांनी तिच्या मुलाशी संपर्क साधत मृतदेहाचे वर्णन सांगितले असता त्याने हा मृतदेह आपल्या आईचा असल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले.

ही महिला मालवण तालुक्यातील चिंदर येथील असून ती सेवानिवृत्त शिक्षिका आहे. ती मूळची गुजरात राज्यातील असून तिचा विवाह मूळ चिंदर येथील उद्योजकाशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सहा महिन्यांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून तेव्हा पासून त्या मानसिक तणावाखाली होत्या. दरम्यान ती गावी चिंदर येथे येण्यासाठी मुंबई येथून रेल्वेने निघाली होती. मात्र ती सावंतवाडी- मळगाव रेल्वे स्टेशनवर उतरली. बुधवारी तिचा मुलगा सावंतवाडीत आल्यावर मृतदेह त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT