साेलापुर/मोहोळ ; पुढारी वृत्तसेवा : इनसेक्टीसाईड हे कीटकनाशक विकण्यास परवानगी नसताना त्याची विक्री करणार्या आष्टी (ता. मोहोळ) येथील कृषी केंद्रावर पं.स.च्या कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. 26) छापा टाकला.
कारवाई दरम्यान पथकाने इनसेक्टीसाईड या कीटकनाशकाचे चार लाखांचे 15 बॉक्स ताब्यात घेऊन हे कृषी केंद्र सील केले आहे. या प्रकरणाची मोहोळ पोलिसांकडून चौकशी आहे. परंतु मंगळवारी रात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
या बाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील आष्टी गावात सिद्धेश्वर माने यांचे ग्रीन इंडिया अॅग्रोटेक नावाचे कृषी केंद्र आहे. या कृषी केंद्रातून शासनाची परवानगी नसलेले इनसेक्टीसाईड हे कीटकनाशक बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याची माहिती मोहोळ पंचायत समितीच्या कृषी विभागाला मिळाली होती.
त्यानुसार कृषी विभागाच्या अधिकार्यांनी पोलिस पथकासह सोमवारी दुपारी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी सदर कृषी केंद्रात इनसेक्टीसाईड या कीटकनाशकाचा साठा मिळून आला. यामुळे कृषी विभागाने सदर केमिकलचा साठा ताब्यात घेऊन कृषी केंद्र सील केले.
सोमवारी रात्री उशीरापर्यंत या संदर्भात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल होईल अशी अपेक्षा होती. पण ती झाली नाही. मंगळवारीही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
मात्र पं.स. च्या कृषी विभागाकडून चौकशीच्या नावाखाली दिरंगाई होत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग संतापला होता. त्यामुळे मंगळवारी कृषी विभागाकडून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. या संदर्भात रात्री उशीरा पर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.