Uncategorized

सावधान..! शहरात कोरोना वाढतोय

backup backup

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसामध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आकडा वाढून 20 रुग्णांवर रुग्णालयातून उपचार सुरु आहेत. शहरातील रुग्णांची संख्याही 15 वर गेल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश दिलेले आहे. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसामध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर खूपच कमी असला तरी रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेनंतर सोलापूर शहरातील कोरोना रुग्णसंख्या ही शून्यावर आली होती. गेली अनेक दिवस हा आकडा कायम होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

17 जून रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहिर झालेल्या अहवालानुसार शहरातील 285 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून बाधित रुग्णांची संख्या ही 15 वर पोहोचली असून त्यामध्ये 7 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. या अहवालामध्ये 5 रुग्ण हे कोरोना बाधित आढळून आले असून त्यामध्ये 1 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 33 हजार 684 रुग्ण बाधित झाले असून त्यापैकी 32 हजार 164 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 1505 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांनी मास्क वापरावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

लसीकरण वाढविण्याची गरज

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेनंतर लसीकरणामध्ये वाढ करण्यात आली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे लसीकरणाकडेही नागरिकांनी पाठ फिरविली होती. शहरात पहिला डोस घेणार्‍यांची संख्या ही 6 लाख 83 हजार 869 असून दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या ही 5 लाख 15 हजार 253 इतकी आहे. परंतु, बुस्टर डोस घेणार्‍यांची संख्या ही केवळ 22 हजार 639 इतकी असून बुस्टर डोसकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT