Uncategorized

सावकाराकडून शेती बळकावण्याचा प्रयत्न; सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

backup backup

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

शेतीत अडचण आल्याने व्यवसायानिमित्त घेतलेल्या 12 लाख रुपये कर्जाचे पाच टक्के व्याज व चक्रवाढ व्याजाने 35 लाख रुपये परत दे. कर्जापोटी बक्षीस पत्रांनी घेतलेली जमीन नावावर करून घेतो, अशी दमदाटी केल्याबद्दल प्रकाश पडळकर या सावकाराविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी याबाबत शेतकरी संदीप माळी-तोडकर (रा. कोळा, तालुका सांगोला) यांनी फिर्याद दिली.

कोळा, येथील संदीप माळी -तोडकर यांनी सन 2018 मध्ये गावातील सावकार प्रकाश पडळकर यांच्याकडून व्यवसायानिमित्त 3 टक्के दराने पहिल्यांदा 7 लाख आणि नंतर पाच लाख असे एकूण 12 लाख रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेपोटी संदिप माळी याने त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली कोळा येथील जमीन गट नंबर -633 मधील 96 गुंठे जमीन मागील 7 ते 8 वर्षापूर्वी पहिल्या व्यवहाराच्या वेळी बक्षीस पत्राने नावावर करून दिली होती. त्यांनी याच्या मुद्दलपोटी सुमारे दीड लाख रुपये व्याजाचे ऑनलाइन व ऑफलाइनद्वारे पडळकर याला पैसे दिले होते. त्यानंतर लॉकडाऊन कालावधीत त्याचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांना सावकाराचे पैसे देता आली नाहीत.

दरम्यानच्या काळात सावकार पडळकर याने संदीप माळी यास 30 लाख रुपयांची मागणी करून जमीन परस्पर विकून टाकण्याची धमकी दिली. यासंदर्भात गेल्या 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास गावातील सकट यांच्या वखारीसमोर जयराम पाटील यांच्या घरात किसन सलगरे, दगडू कोळेकर, संभाजी गोडसे व शीतल पाटील सोनी वगैरे लोकांसमक्ष सदर व्यवहार मिटवण्याकरता बसले होते.

त्यावेळी प्रकाश पडळकर यांनी 12 लाख रुपये मुद्दल, दीड लाख रुपये व्याज व रोखीने घेतलेले 1 लाख 20 असे एकूण 2 लाख 70 हजार रुपये सोडून उर्वरित व्याज व मुद्दल असे मिळून 35 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी संदीप माळी याने इतके पैसे कसे होतात, असे विचारल्यावर व्यवहार होऊन सहा महिने झाले. पैसे आले नाहीत आता ते 5 टक्के व्याज व चक्रवाढ व्याजाने परत द्यावे लागतील. मी सांगतो तेवढे पैसे द्या, नाहीतर मी जमीन विकून टाकतो. तुमचा काही संबंध नाही. माझ्या पैशाची वसुली मी करून घेतो, अशी धमकी देत सावकाराकडून शेती बळकावण्याचा प्रयत्न केला.

बक्षीसपत्रापोटी जमीन दिल्याने ती माझ्या नावावर आहे, मी मालक आहे उद्यापासून तुम्ही शेतात जायचे नाही नाहीतर मी सोडणार नाही, अशी धमकी दिली. परंतु संदीपने जमीन नावावर करण्यास विरोध केला. याप्रकरणी माळी याने सांगोला पोलिस ठाण्यात सावकार पडळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये संदीपने आमची जमीन पडळकर हा परस्पर विकण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सावकाराकडून शेती बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT