सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली महापालिकेतील वीज बिल घोटाळाप्रकरणी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. हा घोटाळा संगनमताने झाला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
'महावितरण'विरोधात ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णयही झाला. चैत्रबन ते आरवाडे पार्क या एकाच नाल्यावर 10 कोटी खर्च करण्याऐवजी 8 नाल्यांसाठी ही तरतूद करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. नाल्यांसंदर्भात महापालिकातील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत तोडगा काढू, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
महापालिकेची महासभा सोमवारी ऑनलाईन अॅपद्वारे झाली. अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश देशमुख, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, आयुक्त नितीन कापडणीस तसेच नगरसेवक, अधिकार्यांनी महासभेत ऑनलाईन सहभाग घेतला.
नगरसेवक संतोष पाटील यांनी महापालिकेच्या पथवीज बिल घोटाळ्याप्रकरणी 'पाईंट ऑफ ऑर्डर' मांडली. वीज बिल घोटाळाप्रकरणी नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे. हा घोटाळा 5.62 कोटींवर गेला आहे. दहा वर्षांतील वीज बिलांचे ऑडिट केल्यास घोटाळ्याची रक्कम आणखी वाढेल. सन 2004 पासूनच्या वीज बिलांची चौकशी करावी.
महापालिकेच्या धनादेशातून काही रक्कम खासगी व्यक्तींच्या बिलाला वर्ग झालेली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणविरोधात ग्राहक न्यायालयात केस दाखल करा. घोटाळ्यात महावितरणचे काहीजण असण्याची शक्यता आहे. महावितरणकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्हा अन्वेषणकडून चौकशी करावी.
प्रशासनाला कोणाला वाचवायचे आहे काय, असा प्रश्न शेखर इनामदार यांनी उपस्थित केला. 'बँक, पतसंस्था, महावितरणचे काही अधिकारीही या घोटाळ्यात सामील असण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या धनादेशातून ज्या खासगी व्यक्तींच्या नावावर रक्कम वर्ग झाली आहे, त्यांचीही चौकशी करा', अशी मागणी संजय मेंढे यांनी केली. अॅड. स्वाती शिंदे व अन्य नगरसेवकही चर्चेत सहभागी झाले.
खासगी व्यक्तींचीही चौकशी
महापौर सूर्यवंशी म्हणाले, या घोटाळ्याची तड लावण्यासाठी तीनदा बैठक घेतली. पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेच्या धनादेशातून ज्या खासगी व्यक्तींच्या नावावर पैसे भरले आहेत, त्या खासगी व्यक्तींचीही चौकशी होईल. घोटाळ्याची रक्कम निश्चित करणे सुरू आहे. ग्राहक न्यायालयात महावितरण विरोधात वसुलीचा दावा केला जाईल.
'वीज बिल घोटाळ्याप्रकरणी स्पेशल ऑडिची मागणी शासनाकडे केली. स्थानिक निधी लेखा परीक्षाद्वारे ऑडीट करून घेण्याबाबत शासनाने सूचवले आहे. त्यानुसार ऑडिट सुरू आहे. दरम्यान घोटाळ्यात महावितरणचे काही अधिकारी सामिल असल्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे. ग्राहक न्यायालय, पुरवणी एफआयआर दाखल होईल', असे आयुक्तांनी सांगितले.
'चैत्रबन'वर 10 कोटी खर्चास विरोध
चैत्रबन ते आरवडे पार्क या एकाच नाल्यावर दहा कोटी रूपये खर्च करण्यास सभागृह नेते विनायक सिंहासने यांच्यासह भाजप नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. स्थायी समितीने ठराव केल्याप्रमाणे 8 नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी भापजने केली. नगरसेवक संतोष पाटील, विजय घाडगे यांनी ही रक्कम चैत्रबन नाल्यासाठी शासनाने एकप्रकारे बायनेम मंजूर केली असल्याने ती या नाल्यावरच खर्च करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते, भाजपचे नगरसेवक गजानन मगदूम, काँग्रेस नगरसेविका पद्मश्री पाटील यांनी नाल्याचे बांधकाम कुपवाड येथून उगमापासून करावे, अशी मागणी केली. कल्पना कोळेकर, सविता मदने यांनी शहरातील अन्य नाल्यांचे बांधकाम झाले पाहिजे. स्थायी समितीच्या ठरावानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. प्रशासानने एकाच नाल्याचा प्रस्ताव शासनाला कसा पाठवला, असा प्रश्न शेखर इनामदार यांनी उपस्थित केला. संजय मेंढे, योगेंद्र थोरात, मैनुद्दीन बागवान यांनी मिरजेतील नाले बांधकामाची मागणी केली.
आयुक्त कापडणीस म्हणाले, सर्व नाल्यांचे एकाचवेळी बांधकाम करता येणार नाही. प्राधान्यक्रम ठरवून एकच मोठा नाला 'मॉडेल नाला' म्हणून बांधकाम केला तर त्याचे फायदे तोटे लक्षात येतील. दरम्यान एकाच नाल्यावर 10 कोटी रुपये न खर्च करता 8 नाल्यांवर तरतूद करा, असे सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी सूचवले. जगन्नाथ ठोकळे, विजय घाडगे व अन्य नगरसेवकांची चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान या विषयावर एकमत न झाल्याने सर्वपक्षीय गटनेते, आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांची नावे
राजकीय पक्षांशी संबंधित काही व्यक्तींच्या नातेवाईकांची नावे वीज बिल घोटाळाप्रकरणी बाहेर येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबले जात आहे की काय असा संशय लोकांना येत असल्याकडे काँग्रेस नगरसेवक संतोष पाटील यांनी लक्ष वेधले. प्रशासनाला कोणाला वाचवायचे आहे काय, असा प्रश्न भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार यांनी उपस्थित केला.
नगरसेवकांमध्ये आयुक्त भांडणे लावतात : सूर्यवंशी
नाले बांधकामावरील तरतुदीबाबत चर्चा सुरू असताना भाजपचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी म्हणाले, 'आयुक्त हे नगरसेवकांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करतात. प्रस्ताव एक पाठवायचा, स्थायी समिती समोर वेगळी भूमिका घ्यायची आणि महासभेसमोर तिसराच विषय आणायचा, असा आयुक्तांचा कारभार आहे'.
आयुक्त चिडले आणि म्हणाले, …!
धीरज सूर्यवंशी यांच्या आरोपावर आयुक्त कापडणीस चिडले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. 'महापालिकेत घडलेल्या प्रत्येक बाबीला आयुक्तच कसे जबाबदार. खातेप्रमुखांना काहीच कोण बोलत नाही. तुम्ही महासभेत एक ठराव करता, स्थायी समितीत दुसराच ठराव करता आणि पुन्हा वेगळेच बोलता. काहींना आता आयुक्त स्वप्नातही दिसत आहेत', असा त्रागा आयुक्त कापडणीस यांनी केला.