सांगली पुढारी वृत्तसेवा: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्थापन होऊन चोवीस वर्षे झाली. महापालिकेने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मात्र पूर्वीच्या सांगली नगरपालिकेचे मुख्यालय हेच पालिकेचे मुख्यालय आहे. ही इमारत अपुरी आहे.
प्रशस्त मुख्यालय इमारतीची गरज पाहता महापालिकेने विजयनगर येथे जागा निश्चित केली आहे. अंदाजपत्रकात तरतूदही केलेली आहे. मात्र महानगरपालिका व कृषी विभाग यांच्या काही जागेचे 'अदलाबदल' रखडल्याने मुख्यालय बांधकामाच्या हालचाली थंडावल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पश्चिमेकडील बाजूला महापालिकेच्या मालकीची अडीच एकर जागा आहे. ही जागा महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसाठी निश्चित केली आहे. या ठिकाणी प्रशस्त, देखणी मुख्यालय इमारत उभारण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे.
थोड्या जागेच्या अदलाबदलसाठी इमारत बांधकामाची कार्यवाही रखडली आहे. महापालिकेने कृषिमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या राजकीय वजनाचा वापर होऊ शकतो. मुख्यालय इमारतकामाचा खर्च 33.39 कोटी रुपये आहे.
पालिकेने अंदाजपत्रकात 10 कोटींची तरतूद केली आहे. मुख्यालय इमारत पूर्णत्वास दोन वर्षे अपेक्षित आहे. अंदाजपत्रकातील तरतूद, शासन अनुदान, जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळू शकतो.
महापालिका मुख्यालय इमारतीच्या नियोजित जागेला पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली आहे. त्यांच्या सूचनेवरून कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी मंत्रालयात दोनवेळा बैठक झाली आहे. जागेची अदलाबदल, कृषी विभागाला रस्त्यासाठी जागा सोडणे आदी बाबींवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मार्चअखेर जागेचा प्रश्न संपेल. दोन-तीन महिन्यात मुख्यालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन होईल.
– दिग्विजय सूर्यवंशी, महापौर
कारभार चार ठिकाणांहून
महापालिकेचे मुख्यालय हे सांगली नगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीत आहे. या इमारतीशिवाय 'मंगलधाम', महापालिका शाळा नंबर एक समोरील प्रशासकीय इमारत आणि 'आरसीएच' इमारत या ठिकाणाहून विविध विभागांचा कारभार सुरू आहे. हा सर्व कारभार एकाच छताखाली येण्यासाठी मुख्यालय इमारत बांधकाम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.
विजयनगर येथे महापालिकेची अडीच एकर जागा आहे. या जागेला 58 मीटर 'फ्रंटेज' आहे. फ्रंटेज 100 मीटरसाठी कृषी विभागाची जागा उपलब्ध आहे. थोड्या जागेची अदलाबदल करावी लागणार आहे. त्यास कृषिमंत्री यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. जागा अदलाबदल अंतिम झाल्यानंतर काही खासगी जागेचे संपादन केले जाईल. मुख्यालय इमारत बांधकाम लवकरच मार्गी लागेल.
– नितीन कापडणीस, आयुक्त