Uncategorized

शेतकर्‍यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा : राऊत

backup backup

बार्शी : पुढारी वृत्तसेवा खत विक्रेत्यांनी शेतकर्‍यांची पिळवणूक न करता त्यांना सुरळीत व मुबलक खत पुरवठा करावा. कोणालाही खत कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तक्रार आल्यास कोणाचीही गय करणार नाही. शेतकर्‍यांनी खतांबाबत अडचण आल्यास थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे सांगत आ. राजेंद्र राऊत यांनी दै. 'पुढारी'तील 'खताला लिंकिंगचे ग्रहण' या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर बार्शीतील बाजार समितीमध्ये आयोजित आढावा बैठकीत कृषी अधिकारी व खत दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी केली.

यावेळी आ. राजेंद्र राऊत यांनी बार्शीच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी विभाग व खत दुकानदारांची संयुक्त आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांना अध्यक्षस्थानावरुन बोलताना यापुढे शेतकर्‍यांना खतांविषयी कोणतीच अडचण येणार नाही तसेच शेतकर्‍यांच्या कुठल्याच तक्रारी माझ्यापर्यंत येऊ नयेत याबाबत अधिकारी व खत दुकानदारांना सक्त ताकीद दिली.

यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, पं.स. माजी सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, पं.स. कृषी अधिकारी किशोर अंधारे, रावसाहेब मनगिरे, कुंडलिक गायकवाड, खत दुकानदार राहुल मुंढे, नाना मते, नितीन कोकाटे, कांतीलाल मुनोत, उमेश चौहान, दिनेश सुपेकर, धनंजय पाटील आदींसह संबंधित कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बार्शी शहर व तालुक्यातील खत विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची खतांसाठी पिळवणूक होत असल्याबाबतची बाब दै. 'पुढारी'ने उजेडात आणली होती. याची आ. राजेंद्र राऊत यांनी दखल घेऊन तातडीने आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी आ. राऊत यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरत लिंकिंगच्या घटना घडू नयेत, असे सांगून शेतकर्‍यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. मी पूर्ण वेळ आपल्यासाठी उपलब्ध असून शेतकर्‍यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा अथवा फोन करावा. आ.राजेंद्र राऊत पुढे म्हणाले की कृषी विभागाने तालुक्याच्या ग्रामीण भागात व गावागावांत जाऊन तेथे शेतकर्‍यांची बैठक घेऊन त्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करावे.आपला व्यवसाय करताना शेतकर्‍यांना कोणताही दगाफटका होणार नाही याची दक्षता सर्व दुकानचालकांनी घ्यावी. अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयात न बसता आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जाऊन पेरणीूुर्व मार्गदर्शन करावे. गरज पडल्यास मलाही शेतकरी मार्गदर्शनाला बोलवा, मात्र कोणाही शेतकर्‍याची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही आ.राऊत म्हणाले.

सोलापुरात दुकानदारांची झाली होती झाडाझडती

या वृत्ताची दखल घेत नुकतीच जिल्हा कृषी अधीक्षकांकडून बार्शीत खत दुकानचालकांची सोलापूर येथील जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात सुनावणी पार पडली होती. यामध्ये खत दुकानांच्या दप्तराची चौकशी करण्यात आली होती. तसेच, चौकशीदरम्यान शेतकर्‍यांना खत कमी पडणार नाही, तक्रारी येणार नाहीत, खतांची साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना देत त्यांनीही चांगलीच झाडाझडती घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT