औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा ः शिवसेनेतील दोन गटांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शिंदे विरुद्ध
ठाकरे गट केवळ असाच संघर्ष नसून मित्रपक्षांचे कार्यकर्तेही एकमेकांच्या समर्थनार्थ विरोधकांवर तुटून पडले आहेत. परंतु असे असतानाही पक्षाचे प्रमुख नेते मात्र एकत्र आल्यावर हसतखेळत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत.
पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा विमान प्रवासातील असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले होते. रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दोघेही एकाच हॉटेलमधून बाहेर पडले.
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्यांनी एकाच गाडीतून औरंगाबाद-गेवराई असा प्रवास केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. या प्रवासादरम्यान या नेत्यांमध्ये शिवसेनेतील वादंगावर तर चर्चा झाली असेल, असा अंदाज बांधला जातो.