Uncategorized

वैजापूर : कांदाचाळीतून 50 क्‍विंटल कांदे लंपास

सोनाली जाधव

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वक्‍ती पानवी शिवारातील शेतवस्तीवरून चोरट्यांनी कांदाचाळीतून 50 क्‍विंटल कांदे चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. दोन) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली बाबासाहेब गायकवाड यांची वक्‍ती पानवी शिवारात शेतजमीन आहे. त्यांचे पती बाबासाहेब यांचे मागील वर्षी कर्करोगाने निधन झाले असून त्या मुलाबाळांसह सदरील ठिकाणी वास्तव्यास आहेत. ही शेती कसूनच त्या उदरनिर्वाह करतात. दरम्यान शुक्रवारी त्या आजारी असल्याने शहरातील रुग्णालयात उपचार घेऊन माहेरी जरुळ येथे मुक्‍कामी गेल्या. इकडे रात्री आठ वाजता त्यांची मुलगी निकिता हिने शेतात असलेल्या चाळीतील कांद्यावर बारदान टाकले वजेवण आटोपून ती झोपी गेली. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी चाळीत कांद्यावरील बारदान काढण्यासाठी गेली. मात्र चाळीत कांदे दिसून न आल्याने तिने याबाबत आईला फोनवर\ सांगितले. घरी परत येऊन वैशाली यांनी चाळीत जाऊन पाहिले असता त्याठिकाणी असलेले 60 हजार रुपये किमतीचे 50 क्‍विंटल कांदे चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मागील वर्षी पतीच्या अकालीनिधनाने दोन मुली व एका मुलाचे संगोपन व शिक्षणाचा संपूर्ण भार वैशाली यांच्या खांद्यावरच आहे. चोरी गेलेले कांदे विकून चालू वर्षी मुलांचे शैक्षणिक शुल्क व इतर बाबींची तजवीज करण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र या चोरीमुळे त्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. दरम्यान, दरात तेजी आल्याने चोरट्यांनी कांदा चोरीकडे लक्ष वळवले आहे

SCROLL FOR NEXT