Uncategorized

विद्यार्थ्यांनी जेईई, नीट परीक्षांना सामोरे जाणे गरजेचे

backup backup

भोसे (क.): पुढारी वृत्तसेवा सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जेईई, नीट परीक्षा देणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन विशाल गरड यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथील एस. पी. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या माता पालक सभेत व्याख्याते म्हणून प्रा. विशाल गरड बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे माजी सहायक आयुक्त डॉ. नंदकुमार होनराव होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्‍वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, मुख्याध्यापिका एस. बी. चव्हाण, प्रकल्प संचालिका व्ही. एस. वलगे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. गरड म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांची बुद्धी वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. विचारांनी फॉरवर्ड राहत असताना गुणवत्तेतही चार पावले पुढेच राहिले पाहिजे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळायलाच हवे. त्यासाठी माता पालकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा, जेईई, नीट या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची आठवीपासूनच पूर्वतयारी करुन घेणे गरजेचे आहे. ज्या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती, एमटीएस अशा परीक्षांना बसतात आणि उत्तीर्ण होतात, असेच विद्यार्थी भविष्यात जेईई, नीट परीक्षांद्वारे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. मुलांना केवळ नोकरी मिळावी यासाठी शिक्षण न देता आपला मुलगा शिक्षित, सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे म्हणाले की, एस. पी. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पाचवीपासूनच विशेष लक्ष दिले जात आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी करुन घेण्यास संस्थेने प्राधान्य दिलेले आहे. पालकांनीही आपली जबाबदारी ओळखून मुलांना कमीत कमी मोबाईल वापरु द्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष पांडुरंग भिंगारे, उपाध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्यासह माता पालक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक साईनाथ कुंभार यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT