सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा 4 जुलै ते 12 जुलैदरम्यान होणार होत्या. परंतु, पंढरपूर आषाढी वारीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
गेल्या मार्च -एप्रिल 2022 या सत्र हंगामातील सर्व विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 20 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. तसे अंतिम वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु, जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशी आहे. त्यामुळे 4 जुलै ते 12 जुलैदरम्यान कोणत्याही परीक्षाचे आयोजन करू नये, असे वारी मार्गावरील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यापीठास विनंती करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेदरम्यान गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेतली आहे. यासाठी सर्व विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची 4 जुलै ते 12 जुलै या कालावधीत होणार्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.