Uncategorized

वारी २०२२ : ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।’

Arun Patil

"जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटताची ॥

या भावनिक ओढीने लाखो भाविकांचा महामेळा पंढरीत दाखल होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे बंद झालेला पायी पालखी सोहळा प्रथमच साजरा होत आहे. मजल दरमजल करत पालख्या, दिंड्या विठुरायाच्या नगरीत दाखल होत आहेत. हरिनामाचा जयघोष घुमत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक व सामाजिक रूपाचे चित्र यानिमित्ताने पंढरीत दृष्टीस पडते आहे.

पंढरीचा पांडुरंग कोण? तो कोणाचा, कोणत्या जाती-धर्माचा याविषयी अनेक वाद-विवाद असले तरी ते फक्त विचारवंत आणि ग्रंथ पुराणकांपुरतेच मर्यादित आहेत. सर्वसामान्य भाविकांना याच्याशी काही देणे-घेणे नसते. त्याला फक्त विठ्ठलाचे रूप आणि चंद्रभागेचे पवित्र स्नान, पंढरीतील भक्तिमय वास पुरेसा असतो. जगण्याच्या संघर्षात या फाटक्या-तुटक्या, भोळ्या आणि भाबड्या भाविकांना पुढच्या संसारात ऊर्जा पुरवण्याचे काम हा सावळा विठोबा करीत असतो. सर्वसामान्य आणि सर्व जाती-धर्माचा माणूस या ठिकाणी आला म्हणजे सर्व दु:खांचा त्यास विसर पडतो. थकवा, शीण दूर जातो आणि आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत नवी ऊर्जा इथे मिळते. म्हणूनच या आषाढी वारीचे वारकर्‍यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पंढरपूर हे आगळे-वेगळे क्षेत्र.सांप्रदायिकदृष्ट्या आणि अन्यदृष्ट्या या क्षेत्राला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पंधराशे वर्षेे या सांप्रदायाचा प्रवाह सतत वाहत आहे. मध्यंतरीच्या काळात या सांप्रदायाच्या काही शाखा, प्रवाह निर्माण झालेले दिसतात; परंतु त्यांचे वेगळेपण काही काळापुरतेच पाहावयास मिळते आणि नंतर ते सर्व प्रवाह मूळ सांप्रदायात एकरूप झाले. या सांप्रदायाचा आद्यकर्ता भगवान शंकर आहे. त्याची अनेक रूपे आणि अवतार झालेले दिसतात. मग-सम-विष्णू-श्रीकृष्ण असे त्याचे अवतार झाले. पंढरीचा सांप्रदाय हा मानवतावादी सांप्रदाय आहे आणि पंढरपूर हे मानवतेचा संदेश देणारे क्षेत्र आहे. पंढरपूर कोणाचे? कोणत्या विचार प्रवाहाचे? कोणत्या तत्त्वज्ञानाचे? असे प्रश्न जर कोणी विचारले तर त्याला असे दिसून येईल की, पंढरपूर हे सर्वांचे, सर्व सांप्रदायांचे, विचारांचे, जाती-धर्मांचे, राजकीय तत्त्वज्ञानाचे अनाकलनीय क्षेत्र आहे.

या सांप्रदायात वेगळेपण पाहावयास मिळते; पण ते केवळ वरचेवर आहे. वारकरी किंवा भागवत सांप्रदाय नावाने ओळखला जाणारा हा सांप्रदाय अफाट आणि शाश्वत आहे. पंढरपूरला भक्तिभावाने आणि अत्यंत दृढ श्रद्धेने दर्शनाला येणार्‍यांमध्ये सर्व लोक पाहावयास मिळतात.

हजारो अनुयायी आजदेखील आषाढी-कार्तिकी यात्रेला वारकरी म्हणून येतात. 'वीर' विठ्ठलाचे गाढे, कळीकळा भय पडे।' असे वर्णन संघर्ष करणार्‍या वारकर्‍यांचे आहे. वारकरी हे आळशी आहेत, कर्मदरिद्री आहेत किंवा निरुद्योगी आहेत असे नाही. 'कर्मेईशु भजावा' या सिद्धांताला अनुसरून त्यांचे जीवन चालते. 'वारकरी' या शब्दाचा काही लोकांना निश्चित अर्थ आणि त्यामागील मोठा इतिहास माहिती नसल्याने काही मंडळी त्यांवर टीका करतात; परंतु पंढरीचे गणगोतच इतके विशाल की, त्यापुढे ती टीका व्यर्थ आहे.

वारकरी सांप्रदायाचा महाराष्ट्रातील विविध पक्षांवर परिणाम दिसून येतो. राजकारण, धर्म, समाजकारणात पंढरपूरच्या या सांप्रदायाचा प्रभाव पाहावयास मिळतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, दादा धर्माधिकारी, जयप्रकाश नारायण, पंडित जवाहरलाल नेहरू या राजकीय मंडळींनी साम्यवादाचा उदो-उदो केला. भारताची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून पंचवार्षिक योजना राबविल्या. या सर्व लोकांना समानता आणावयाची होती. वारकरी सांप्रदायात किंवा पंढरपूरच्या वैष्णव सांप्रदायात आरंभापासून समानतेवर भर आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात सर्वजण सारखेच असतात, असा प्रचार संतांनी केला.

'यारे यारे लहान-थोर' किंवा 'कोण्याही जीवाचा न घडो मत्सर' या वचनांंचा सर्वांना सामावून घेणार्‍या या विचारसरणीशी संबंध आहे. संतांनी कोणताही भेदभाव केला नाही. प्रकाश, आनंद, महानुभाव, समर्थ असे विविध सांप्रदाय महाराष्ट्रात आहेत, ते यामुळेच.

एकेकाळी त्यांचा प्रभाव जनमानसावर होता; परंतु वारकरी सांप्रदायाचा सर्वसामान्य माणसाचा उद्धार करणार्‍या तत्त्वज्ञानापुढे वरील सांप्रदायांचा टिकाव लागला नाही. गीता, भागवत आणि संतांचे अभंग ही महाराष्ट्राची त्रिसूत्री आहे. या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे वारकरी सांप्रदायाचे म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाचे तत्त्वज्ञान आहे. या त्रिसूत्रीचा प्रभाव महाराष्ट्रावर हजारो वर्षांपासून दिसत आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वही या वारीमुळे जगभर प्रसिद्धीस पावले. सामाजिक समतेचा संदेश देणारी अशा प्रकारची वारी जगाच्या पाठीवर इतरत्र भरत नाही. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी 'ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर दावा कोठे' असे आवाहन केले आहे. सर्वसामान्यांची सुख-दु:खातून सोडवणूक करणार्‍या या पंढरीत शेकडो वर्षांपासून लाखो भाविक 'जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा।' या भावनेने येत आहेत. कोरोना काळात खंड पडल्याने या यात्रेला लाखोंच्या संख्येने शिस्तीचे पालन करत येत आहेत. आज एकादशीला या विठुनामाचा गजर आणि जागर!

सिद्धार्थ ढवळे पंढरपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT