औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा काँग्रेसमधील सर्वच नेत्यांचा विरोध असताना, वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच मला वयाच्या 25-26 व्या वर्षी उमेदवारी मिळाली, मी आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत गेलो. त्यानंतर मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही दिली, अशी आठवण राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी सोमवारी सांगितली. वसंतराव नाईक महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, काही लोकांचे स्मरण माझ्या अंत:करणात कायम आहे, त्यात यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक आहेत. तरुण कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना, विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितले असता, आमच्या जिल्ह्यातील सगळ्या काँग्रेस नेत्यांनी विरोध केला. माझे वय तेव्हा 25-26 वर्षे होते. हे नेते
वसंतराव नाईक व यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गेले असता, या दोघांनीही त्यांना विचारले, '288 जागा असून, त्यातील आपल्या किती जागा निवडून येतील?' यावर त्यांनी '190-200 जागा येतील,' असे उत्तर दिले. याचा अर्थ 98 जागा आपल्या पडतील, त्यात आणखी एक पडली तरी काही हरकत नाही, शरद पवारला तिकीट देऊन टाका, असा निर्णय दोन्ही नेत्यांनी दिला.