सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा लाल बावटा बांधकाम कामगार युनियनच्या कोनापुरे चाळ शाखेचे उद्घाटन कामगार नेते नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आडम म्हणाले, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. या कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायद्याचे संरक्षण मिळावे म्हणून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने मी विधानसभेत आवाज उठवून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास राज्य शासनास भाग पाडले. म्हणून आज बांधकाम कामगारांना जुजबी लाभ मिळत आहेत. पण, हे तुटपुंजे लाभ बांधकाम कामगारांना स्थैर्य प्राप्त करून देणारे नाहीत.
याकरिता बांधकाम कामगारांची एकजूट आणि रस्त्यावरची लढाई अनिवार्य आहे. युनियनची शाखा केवळ बांधकाम कामगारांसाठी नसून सर्व नागरी समस्या निवारणासाठी आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. यावेळी सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख, रंगप्पा मरेड्डी, अनिल वासम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विक्रम कलबुर्गे, कुर्मय्या म्हेत्रे, तानाजी जाधव, राम मरेड्डी, प्रदीप मरेड्डी, सेनापती मरेड्डी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.अब्राहम कुमार यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत केंदळे यांनी केले.