Uncategorized

लागला टकळा पंढरीचा

backup backup

जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज देहूमध्ये कार्यरत होते तेव्हा अनेक सत्पुरुषांनी त्यांना मदत केली. अनेक संत त्यांचे शिष्य होते. ही मंडळी तुकोबांचे टाळकरी म्हणून ओळखले जातात. हे 14 टाळकरी तुकोबांच्या कीर्तन आणि भजनात असत. शिवाय संताजी महाराज जगनाडे यांनी तुकोबांच्या रचना जतन करण्याचे कामही केले. तुकोबांचे काही अभंग त्यांनी स्वतः लिहिले आहेत. काही अभंग या संताजी जगनाडे यांनी लिहिले आहेत. जगनाडे हे तुकाराम महाराजांचे लेखनिक होते. तुकोबांच्या निर्वाणानंतर संताजी महाराज समाधिस्थ झाले. त्यांचे मूळ गाव चाकण तर समाधीस्थळ सदुंबरे. ते त्यांचे आजोळ. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी हा त्यांचा समाधी दिवस.

45 वर्षांपूर्वी संताजी महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. सुरुवातीला सोहळ्याचे स्वरूप साधे होते. पुढे दोन बैल असलेला रथ बनवण्यात आला. 2017 मध्ये भाविकांनी देवाला चांदीचा रथ अर्पण केला. सुरुवातीला पालखी देहूतील तुकाराम महाराजांच्या पालखीमागे जात असे. पुढे मार्गात बदल करण्यात आला व पुण्यापासून जगनाडे महाराजांचा पालखी सोहळा हडपसरपर्यंत तुकाराम महाराजांच्या पालखी मागे असतो. हडपसरवरून ज्ञानोबा व तुकोबांचे पालखी मार्ग वेगळे होतात, तेव्हा ही पालखी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीमागे सासवडला येते.

पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला म्हणजे तुकोबांच्या प्रस्थानाच्या दिवशी होते. प्रस्थानाच्या आधी जगनाडे महाराजांच्या पादुका जवळच असणार्‍या देहूला वाहनाने नेल्या जातात. तेथे गुरू व शिष्याची भेट होते. पहिला मुक्‍काम काळे यांच्या विठ्ठल मंदिरात असतो. हे काळे म्हणजे जगनाडेंच्या मामांचे वंशज. त्यामुळे याला आजोळ घर म्हणतात. पालखी सोहळ्यात रोज कीर्तन होत नाही. ज्या दिवशी दिवसभर एकाच ठिकाणी मुक्‍काम असतो अशा पुणे, सासवड, फलटण आदी गावांत कीर्तन होते. सोहळ्यासोबत एक घोडा असतो. या देवाच्या घोड्यावर कोणी बसत नाही.

पालखी आषाढ शुद्ध नवमीला पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. गर्दीमुळे एकादशीला पुन्हा चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होत नाही. पौर्णिमेला पालखी गोपाळपूरला जाते. परतीचा प्रवासही ज्ञानेश्‍वर माऊलींच्या मागे-मागे असतो. पालखी ज्येष्ठ वद्य एकादशीला आळंदीला येते. तेथे ज्ञानेश्‍वर माऊली दर्शनानंतर वद्य द्वादशीला पालखी जगनाडे महाराजांच्या मूळ गावी म्हणजे चाकणला जाते. तेेथून पालखी ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला सदुंबरेला परत येते आणि सोहळ्याची सांगता होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT