ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कल्पिता पिंपळे या महिला अधिकार्यावरील हल्ला दुःखद आहे; मात्र अशाप्रकारचा हल्ला करणार्यांची हिंमत ठेचून काढली पाहिजे, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. आमचे आंदोलन हे अधिकृत फेरीवाल्यांविरोधात नाही. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले. पोलिस आणि न्यायालय उचित कारवाई करेल, असा आम्हाला विश्वास असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात राज ठाकरे यांनी भेट घेतली. कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. मनसे अनधिकृत फेरीवाल्यांना अद्दल घडवेल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलिस उपायुक्तांशीही चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिसही त्या फेरीवाल्यावर कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले, जे काही घडलेय त्याचे दु:ख आहे; पण काळही सोकावतो. अशाप्रकारची हिंमत ठेचणे गरजेचे आहे. यापूर्वी ठाकरे यांनी 'कृष्णकुंज'वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला होता. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केलेला फेरीवाला पोलिसांच्या तावडीतून सुटला की मनसैनिक त्याला चोप देतील, असे रोखठोक विधान राज ठाकरे यांनी केले होते.